(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'त्या' वक्तव्याचा अर्थ मुख्यमंत्रीच सांगू शकतात : बाळासाहेब थोरात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. आजी माजी सहकारी एकत्र आले तर भावी सहकारी होऊ शकतात, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याविषयी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ मुख्यमंत्री सांगू शकतात, थोरात यांनी म्हटलं आहे. मात्र ते जुने सहकारी असल्याने आमच्याबरोबर (काँग्रेस), राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर या आणि सहकारी व्हा असा अर्थ आम्ही काढत असल्याचं थोरात यांनी सांगितलं. इतकेच नाही तर भाजपमध्ये सध्या नैराश्य असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होत असलेली चलबिचल कमी व्हावी म्हणून ते स्वप्न दाखवतात, असा टोलाही थोरात यांनी भाजपला लगावला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
औरंगाबाद येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच भरभरून कौतुक केलं. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुढाकार घेणार असतील तर राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहिल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय. यावेळी आजी माजी सहकारी एकत्र आले तर भावी सहकारी होऊ शकतात, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.
बुलेट ट्रेनला मुख्यमंत्र्यांच्या पाठींब्यानंतर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी म्हणतात..
भाजप-शिवसेना भविष्यात अनेक वर्षे ते एकत्र येण्याचे संकेत नाही : मिटकरी
यावर आमदार अमोल मिटकरी यांना विचारले असता ते म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलले ते मी ऐकले नाही. मात्र, राजकीय शिष्टाचार म्हणून या गोष्टी पाळाव्या लागतात. मिटकरी म्हणाले, की भाजपचे शिवसेने सोबतचे वर्तन पाहता भविष्यात अनेक वर्षे ते एकत्र येण्याचे संकेत नाही. ज्या पद्धतीने शिवसेनेला डिवचण्याचं काम सुरू आहे, त्यावरुन तरी असे दिसत नाही. मात्र, मुख्यमंत्री देखील चांगलं काम करताय त्यामुळे ते राजकिय शिष्टाचार म्हणून बोलले असतील. मात्र, वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही, असं मिटकरी यांनी म्हटलंय.
दानवेंनी आपले वजन वापरून त्यासाठी पुढाकार घ्यावा : मुख्यमंत्री
मुंबई-नागपूर बुलेट हा प्रोजेक्ट राज्यासाठी महत्वाचा ठरेल आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी आपले वजन वापरून त्यासाठी पुढाकार घ्यावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दानवे जर पुढाकार घेत असतील तर राज्य सरकार त्याच्या पाठिशी ठामपणे उभं राहिल असंही ते म्हणाले. रुळ सोडून धावू शकत नाही म्हणून मला रेल्वे आवडते असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.