बुलढाण्यातील मनसेच्या 28 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; पालिका निवडणुकीआधीच मनसेला धक्का
बुलढाणा जिल्ह्यात मनसेच्या नाराज 28 पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पालिका निवडणुकीआधीच मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

बुलढाणा : मुंबईसह राज्यातील 15 महानगरपालिकांच्या निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. राज ठाकरे महापालिकेच्या तयारीला लागले असतानाच त्यांना जोरदार धक्का बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मनसेच्या तब्बल 28 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात मनसेच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्षांनी विश्वासात न घेता नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील सिंदखेदराजा व देऊळगांवराजा तालुक्यातील 28 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
पालिका निवडणुकीच्या तोंडावरच या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी बुलढाणा, नाशिक आणि पुण्याचा दौरा केला होता. त्यामुळे एकीकडे राज ठाकरे पक्ष वाढीसाठी राज्यदौरा करत आहेत. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील 28 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे संपर्क प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
मनसेचं महावितरण कार्यालयात आंदोलन
दम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील महावितरणच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना आज मनसे कार्यकर्त्यांनी चांगलचं धारेवर धरलं. कार्यालयीन वेळेत एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहत नाही, अधिकाऱ्यांचे फोन नॉटरीचेबल असतात, कर्मचारी वसुलीच्या नावाखाली गैरहजर राहत असतात, असे आरोप करत कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या दांड्या मारण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या 5 दिवसांच्या आत या कार्यालयमध्ये तक्रारी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कार्यकारी अभियंता शेगावकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
























