रवी राणांच्या वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद, लाडक्या बहिणींबाबतच्या विधानावरुन मुख्यमंत्री भावाचा संताप
आपल्याच पक्षांचे नेते असा वाचाळपणा करत असल्यानं त्यांना तंबी देण्याची वेळ आलीय. आमदार रवी राणांच्या वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीतही या वक्तव्याचे पडसाद उमटले.
मुंबई : विधानसभा जिंकण्यासाठी (Vidhan Sabha Election ) महायुती लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojna) जोरदार प्रचार करतेय. तर दुसरीकडे महायुतीच्याच काही नेत्यांनी या योजनेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीला डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आलीय. रवी राणा आणि महेश शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवरून मतदार आणि विरोधकांना धमकावल्याचा आरोप होतोय. याचे पडसाद आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. विरोधकांना आयतं कोलित मिळेल अशी वादग्रस्त वक्तव्य करू नका, अशी तंबी मुख्यमंत्र्यांंनी दिली. दरम्यान मतांचा आशीर्वाद मिळाला नाही तर दीड हजार काढून घेऊ असं रवी राणा म्हणाले.होते.. तर लाडकी बहीण योजनेतून नाव काढून टाकण्याचं वक्तव्य कोरेगावचे आमदार महेश शिंदेंनी केलं होतं.
लाडक्या बहीण योजनेसाठी एकीकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वत: मैदानात उतरलेत. तर दुसरीकडे आपल्याच पक्षांचे नेते असा वाचाळपणा करत असल्यानं त्यांना तंबी देण्याची वेळ आलीय. आमदार रवी राणांच्या वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीतही या वक्तव्याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्र्यांनीही सांभाळून बोला अशा कानपिचक्या दिल्या. तसेच यापुढे प्रत्येक मंत्री, लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करूनच लोकांशी बोलावं. वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारच्या योजनांवर परिणाम होतो या वादग्रस्त वक्तव्यांचा विरोधकांनाच फायदा होतोय. इतकंच नाही तर महायुतीच्या नेत्यांनीही संताप व्यक्त केलाय.
कोण काय म्हणाले?
लोकप्रतिनिधी असे वक्तव्य करतात हे दुर्दैव आहे. सरकारने लाडक्या बहिणीसाठी ही योजना सुरू केलेली आहे ती कुठल्याही परिस्थिती बंद होणार नाही. रवी राणा यांना मी तुमच्या माध्यमातून आवाहन करते की अशी वक्तव्य करू नयेत, असे आदिती तटकरे म्हणाल्या. रवी राणा यांचं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे. सरकारने आणलेली योजना आहे. विनोदात म्हटले असतील तरी ते चुकीचेच आहे असं वक्तव्य पुन्हा करू नये, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
कोणताही भाऊ दिलेले ओवाळणी परत घेत नसतो : प्रतापराव जाधव
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, रवी राणा कोण? मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून आणि लाडकी बहीण योजनेचे हप्ते म्हणून हे पैसे दिलेले आहेत आणि कोणताही भाऊ दिलेले ओवाळणी परत घेत नसतो.
नवनीत राणांचं वक्तव्य महायुतीला एवढं झोंबलं की राणांना अमरावतीत होणाऱ्या समन्वय समितीचं आमंत्रणही देण्यात आलं नाही. राणांच्या वक्तव्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करत असले तरी यानिमित्ताने सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी महाविकास आघाडीला मिळाली. तर विरोधी पक्षनेत विजय वडेट्टीवार म्हणाले, हा सरकारचा पैसा आहे. हा पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणा की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री च आहे का? यांची निती दिसली. निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी योजना आणली. बहिणींना फसव्यासाठी योजना आणली. रवी राणा जे बोलला ते सरकारच्या शिंदेच्या मनातील फडणवीस आणि अजित पवार यांच्या मनातील बोलले आहेत. मतांची झाली कडकी, म्हणून बहीण झाली लाडकी आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकातील का?
हे ही वाचा :
"...म्हणून आज मी गुलाबी साडी नेसली", सुप्रिया ताईंनी सांगितलं खास कनेक्शन; दादांना दिलं टेन्शन