(Source: Poll of Polls)
Ratnagiri News : मालकाचा बुडून मृत्यू; कुत्र्यानेही 24 तासात प्राण सोडले!
सुजयचा कोळकेवाडी धरणात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर इमानदार कुत्र्यानेही केवळ 24 तासातच प्राण सोडले. मुक्या प्राण्यांना भावना असतात. ते आपल्यावर जीवापाड प्रेम करतात, सर्वस्व मानतात याचं हे उदाहरण होतं
रत्नागिरी : 27 एप्रिल हा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणवासियांसाठी दु:खद दिवस. कारण, कोळकेवाडी धरणाच्या टप्पा चार जवळच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी दोघांना जवळच्या नागरिकांनी वाचवलं. पण, 31 वर्षीय सुजय आणि 22 वर्षीय ऐश्वर्या मात्र बेपत्ता झाली होती. अखेर शोध संपल्यानंतर दोघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. धक्कादायक आणि वेदनादायी चित्र होतं ते. मोठा आघात झाल्याने घरातील लोकांना धक्का बसणं समजू शकतो. पण, सुजयच्या इमानदार कुत्र्याने देखील केवळ 24 तासातच आपले प्राण सोडले होते. मुक्या प्राण्यांना भावना असतात. ते देखील आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. आपल्याला सर्वस्व मानतात याचं हे उदाहरण होतं. सुजयच्या जाण्याचं दु:ख असताना इमानदार कुत्र्याचं देखील अशा पद्धतीने जाणं सर्वांच्या जिव्हारी लागलं. आसपासच्या गावासह, तालुक्यात आणि जिल्ह्यात देखील याची देखील चर्चा झाली. कॅस्पर या कुत्र्याचं नाव आहे. सुजयसोबत कॅस्पर हा कायमच असायचा. सध्या सुजय आणि कॅस्परचे व्हिडीओ, फोटो पाहिल्यानंतर या दोघांमधील नातं कसं होतं याची प्रचिती येते.
सुजय बुडत असताना कॅस्परची त्याला वाचवण्याची धडपड
ज्यावेळी घटना घडली त्यावेळी कॅस्पर सुजयसोबत होता. सुजय आंघोळीसाठी पाण्यात उतरला, त्यावेळी किनाऱ्यावर उभा राहून कॅस्पर सारं काही पाहत होता. पण, ज्यावेळी सुजय बुडू लागला त्यावेळी त्याने पाण्यात उडी मारली. सुजयला वाचवण्याचे कॅस्परने देखील प्रयत्न केले. तो मोठ्याने भुंकत होता. यापलिकडे कॅस्परला काहीही करणं शक्य नव्हतं. पाण्यात पोहत-पोहत कॅस्पर दुसऱ्या बाजूने बाहेर पडला. या घटनेनंतर शोधमोहीम हाती घेतली गेली. त्यावेळी देखील कॅस्पर त्याच ठिकाणी होता. तो सर्वांसोबत वावरत होता. आपल्या मालकाचा शोध घेत होता. पण, त्यातून काहीही साध्य झालं नाही. जवळपास 24 तासांचा अवधी निघून गेला होता. आपला मालक सुजय कुठेही दिसत नाही. हे पाहिल्यानंतर अखेर कॅस्परने आपला जीव सोडला. सुजयनंतर कॅस्परचं अशा रितीने जाणं सर्वांसाठी धक्का होतं. प्रत्येक जण हळहळ करत होता. समाजमाध्यमांवर देखील त्यानंतर सुजय आणि कॅस्परचे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाले आहे. त्यावर सध्या चर्चा होत आहे. सारी गोष्ट कळल्यानंतर प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे.
अलोरे गावातील चार जण 27 एप्रिल रोजी कोळकेवाडी इथे पोहण्यासाठी गेले होते. परंतु कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडत असता, जवळच्या नागरिकांनी दोघांना वाचवलं तर सुजय गावठे आणि ऐश्वर्या खांडेकर या दोघांचा मृत्यू झाला.