(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नावेद -2 नौका प्रकरण पेटण्याची चिन्हे, मच्छिमारांच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरली
मालवाहू जहाजाने धडक दिल्याने नावेद - 2 ही मच्छिमार नौका बुडाली. या मच्छिमार नौकेवर सहा खलाशी होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला. अन्य पाचजण अद्यापही बेपत्ता आहेत.
रत्नागिरी : जयगड समुद्रात बुडालेल्या नावेद -2 या मच्छिमार नौकेचा आणि त्यावरील पाच खलाशांचा अद्यापही शोध न लागल्यामुळे जयगड परिसरातील मच्छिमार संतप्त झाले आहेत. शुक्रवारी जयगड मच्छिमार संस्थेच्या कार्यालयात मच्छिमारांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून सागरी आंदोलन छेडण्याचाही निर्णय घेण्यात आला.
26 ऑक्टोबर रोजी मच्छिमारीसाठी गेलेली नावेद -2 ही नौका अचानक गायब झाली. या नौकेचा अपघात झाल्याची शक्यता मच्छिमारांनी व्यक्त केली. मालवाहू जहाजाने धडक दिल्याने नावेद - 2 ही मच्छिमार नौका बुडाली. या मच्छिमार नौकेवर सहा खलाशी होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला. अन्य पाचजण अद्यापही बेपत्ता आहेत. त्याचबरोबर शोधकार्य करुनही बुडालेल्या नौकेचा अवशेषही सापडले नाहीत त्यामुळे मच्छिमार संतापले आहेत.
बुडून बेपत्ता झालेल्या मच्छिमारांचे काय होणार? त्यांना कोणी वाली आहे का? असे प्रश्न निर्माण झाल्याने आज जयगड मच्छिमार संस्थेच्या कार्यालयात मच्छिमारांची एक बैठक झाली. या बैठकीला सोसायटीचे अध्यक्ष तबरेज सोलकर, माजी सचिव रवी पोटफोडे, अकबर मोहल्ल्याचे अध्यक्ष मुफ्ती साबीर अहमद डांगे, नौकेचे मालक संसारे आणि इतर मच्छिमार उपस्थित होते. या बैठकीमध्ये मच्छिमारांनी अद्यापही एकाही खलाशाचा किंवा नौकेचा शोध न लागल्याने संताप व्यक्त केला. मच्छिमारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात चक्का जाम आणि समुद्रमार्गे आंदोलन छेडण्याचा विचार मच्छिमारांनी मांडला. आंदोलन निश्चित करण्यापूर्वी संस्थेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. ही समिती आंदोलनाचे स्वरूप निश्चित करणार आहे. प्रांताधिकाऱ्यांकडून मच्छिमारांसोबत एक बैठक होणे अपेक्षित आहे. ही बैठक होण्याची मच्छिमार काही दिवस वाट पाहणार आहेत आणि त्यानंतर नावेद 2 नौकच्या न्यायासाठी चक्का जाम आणि समुद्रमार्गे असे दोन्ही प्रकारचे आंदोलन छेडणार आहेत.
मच्छिमार नौका बुडून 25 दिवस उलटले तरी बुडालेल्या नौकेचे अवशेष आणि पाच खलाशांचे मृतदेह सापडत नाहीत. समुद्रात नौका कशी बुडाली, अपघात झाला का याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच नौका शोधण्याचे काम प्रशासन करत आहे आतापर्यंत तपासात काय सापडले याची माहिती मच्छिमार पोलीस आणि प्रशासनाला निवेदन देऊन मागणार आहेत. नक्की तपासात काय सापडले हे आम्हाला सांगा अशी मच्छिमारांची भूमिका आहे.
जयगडसह गुहागरातील मच्छिमार आंदोलनात उतरणार
आज झालेल्या बैठकीला जयगड परिसरातील मच्छिमार उपस्थित होते. मात्र प्रत्यक्षात आंदोलन सुरु होईल त्यावेळी आजूबाजूच्या मच्छिमारांसह गुहागर तालुक्यातील मच्छिमारही आंदोलनात उतरणार आहेत. त्यामुळे हे आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसात प्रशासनाकडून मच्छिमार नौकेच्या तपासाबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही याबाबत मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली. जयगड मच्छिमार संस्थेमध्ये नावेद 2 चा तपास न लागल्यामुळे आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महत्वपूर्ण बैठक झाली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha