एक्स्प्लोर
जखमींवर उपचार, बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारा पंक्चरवाला
रत्नागिरीतील चिपळूण शहरात समाजानं नाकारलेल्या अनेकांसाठी जीजेश वालम आधार ठरला आहे.
रत्नागिरी : जग जितकं गतिमान होतंय, तितक्याच वेगाने माणसा-माणसातील ऋणानुबंध कमी होऊ लागले आहेत. पण मुंबई-गोवा महामार्गावर पंक्चर काढणाऱ्या एका केरळी तरुणाने नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. गाडीत हवा भरल्याच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून तो करत असलेलं काम तुम्हा-आम्हा सर्वांनाच विचार करायला लावणारं आहे.
रत्नागिरीतील चिपळूण शहरात समाजानं नाकारलेल्या अनेकांसाठी जीजेश वालम आधार ठरला आहे. दवाखान्याच्या वॉर्डमध्ये रुग्णाला कपडे घालणारी व्यक्ती पाहून ती त्याच्या घरची आहे, असं कोणालाही वाटेल. मात्र या दोघांमध्ये रक्ताचं कुठलंही नातं नाही.
चिपळूणच्या सावर्डे गावाजवळ जीजेश वालम पंक्चरचं दुकान चालवतो. गरजूंना कपडे देणं असो, जखमींवर उपचार असो, किंवा बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार असो, या कामांसाठी जीजेश नेहमी धावून जातो. त्यामुळे जीजेशच्या दुकानात पंक्चर काढायला गेलात, तर तुमचे पैसे कधीच वाया गेलेले नसतील.
उद्या आपल्यावर जर ही वेळ आली तर काय, असा मी विचार करतो, असं जीजेश सांगतो. त्यामुळे केरळातील मूळ गावी गेल्यावरही तो तेच काम करतो. पंक्चरच्या दुकानातून मिळणाऱ्या पैशांत जीजेश आपलं घरही चालवतो. उरलेल्या पैशातून तो गरजूंना दवाखान्यात दाखल करतो
सामाजिक कामांत जीजेश अग्रेसर असतो. पैसे आणि दुकान बंद राहण्याचा विचार तो कधीच करत नाही. गेल्या काही वर्षांत महामार्गावर जखमी झालेल्या लोकांना जीजेशच्या सहकार्याचा हात लाभला. रात्री-अपरात्री अनेकांचे प्राण त्याने वाचवले आहेत.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला,
तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा..
संत तुकारामांच्या या ओळी जीजेशसारख्या 'माणसां'ना तंतोतंत लागू होतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement