(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rashmi Shukla: 'फोन टॅपिंग' प्रकरणाला कायमचा पूर्णविराम; रश्मी शुक्लांना दिलासा, खडसे म्हणतात - ही भाजपच्या वॉशिंग मशिनची कमाल
Rashmi Shukla: महाआघाडी सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरण कायमचं बंद झालं आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला. सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला आहे.
Rashmi Shukla Phone Tapping: महाराष्ट्रात गाजलेल्या नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांना (Rashmi Shukla) दिलासा मिळाला आहे, यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) टीका केली आहे. शासनाने रश्मी शुक्ला यांच्या बाबतचा क्लोजर रिपोर्ट (Closure Report) स्वीकारला, या विषयावर बोलताना एकनाथ खडसेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. रश्मी शुक्ला तुमच्या आश्रयाला आल्या म्हणून त्यांना भाजपच्या वॉशिंग मशिनकडून दिलासा मिळाल्याचं खडसे म्हणाले.
एकनाथ खडसेंचा सरकारला सवाल
अपेक्षेप्रमाणे सरकारने रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, असं खडसे म्हणाले. पुढे ते म्हणाले, "माझा फोन टॅप केला, त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसांना अधिवेशनातून प्रश्न विचारला, मात्र त्याचे उत्तर मला दिलं नाही. वास्तविक अजूनही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसतानाही सरकारने क्लोजर रिपोर्ट दिला. उलट रश्मी शुक्लांना क्लीन चीट मिळाली. आमचं म्हणणं न ऐकता आणि आम्हाला उत्तर न देता सरकारने परस्पर क्लोजर रिपोर्ट सादर केला. आग्रहपूर्वक रश्मी शुक्लांना निर्दोष केलं."
एकनाथ खडसेंचा क्लोजर रिपोर्ट गृहमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. मग तो क्लोजर रिपोर्ट सुद्धा कोर्टाला स्वीकारायला लावा, उलट चौकशी का लावतात? असा सवाल एकनाथ खडसेंनी केला.
नक्की प्रकरण काय?
भाजपला धक्का देत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची स्थापन केली होती. याच दरम्यान आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते, हे फोन टॅपिंग प्रकरण राज्यात चांगलंच गाजलं. फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या IPS रश्मी शुक्लांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारल्याने फोन टॅपिंग प्रकरण कायमचं बंद झालं आहे. फोन टॅपिंग प्रकरणाला आता पूर्णविराम मिळाला आहे. रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याच्या आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
हेही वाचा: