क्रांतिकार्यातील सावरकरांच्या सहभागाबद्दल जर जाणून घ्यायचंय तर जुने रेकॉर्ड्स बाहेर काढा : रणजित सावरकर
सावरकर समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने विचार करत होते, असं देखील रणजित सावरकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते.
Ranjit Savarkar On Majha Katta: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Swatantraveer savarkar) स्वातंत्र्यांच्या क्रांतिकार्यात सहभागाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पोलीसांच्या फाईलमध्ये दफन झालेले सगळे जुने रेकॉर्ड्स बाहेर काढा, सत्य समोर येईल असाही दावा रणजित सावरकर यांनी केला आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात रणजित सावरकर हे बोलत होते. ज्यावेळी सावरकर समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने विचार करत होते, असं देखील रणजित सावरकर यांनी म्हटलं आहे.
गांधीहत्येसाठी वापरलं गेलेलं पिस्तुल हे सावरकरांनीच दिलं होतं या तुषार गांधींच्या आरोपावर बोलताना रणजित सावरकर म्हणाले की, महात्मा गांधीचे प्राण वाचवण्यासाठी काँग्रेस कशी अपयशी ठरले हे कपूर कमिशनच्या अहवालात दिलं आहे. रणजित सावरकरांनी थेट काँग्रेसचाच यात हात असल्याचा दावा केला. काँग्रेस सत्तेत आल्यावर सावरकरांची बदनामी बंद होते, मोदी सत्तेत आल्यावर सावरकरांची बदनामी पुन्हा सुरु झाली आहे, असंही रणजित सावरकर म्हणाले.
ब्रिटीश लोकं सावरकरांच्या अर्जाला माफीनामा म्हणत नाहीत
रणजित सावरकर म्हणाले की, सावरकरांनी कधीही माफी मागितली नाही. त्यांनी लिहिलेला अर्ज हा सुटकेचा नव्हताच. तर त्यांनी कैद्यांना असलेल्या नियमांविषयी ते पत्र लिहिलं होतं, असं ते म्हणाले. रणजित सावरकर यांनी म्हटलं की, प्रत्येक अर्जात सावरकरांनी शेवटी असं म्हटलंय की, मला सोडलं नाही तरी चालेल मात्र इतरांना सोडा. ब्रिटीश देखील म्हणायचे की, सावरकर इतके महत्वाचे नेते आहेत की त्यांना जर तुरुंगाच्या बाहेर अंदमानात पाठवलं तर त्यांचे क्रांतिकारक बोट भाड्यानं घेऊन पळवून नेतील. भारतातील कुठलाही तुरुंग त्यांना ठेवायला सक्षम नाही, असं ब्रिटीशांनी म्हटल्याचे ऑनरेकॉर्ड पुरावे आहेत, असा दावा देखील रणजित सावरकरांनी केला आहे. ब्रिटीश लोकं सावरकरांच्या अर्जाला माफीनामा म्हणत नाहीत, आपलेच लोकं त्याला माफीनामा म्हणत आहेत.
फाळणीवरुन सावरकरांवर आरोप केला जातो मात्र त्यासंदर्भातले खरे दोषी नेहरुच आहेत आणि त्यांनीच फाळणीनंतर होणाऱ्या रक्तपाताची पूर्ण कल्पना असतानाही निर्णय घेतले, असाही दावा रणजित सावरकर यांनी केला. त्यासंदर्भातल्या माऊंटबॅटन यांच्या कागदपत्रांचे दाखलेही त्यांनी दिले.
सावरकर समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने
रणजित सावरकर म्हणाले की, ज्यावेळी सावरकर समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने विचार करत होते. गांधींचा जातिभेदावर विश्वास होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही गांधींच्या विचारांबाबत टीका केली होती. काँग्रेसने अधिकृत भूमिका घेतली की ब्रिटीशांविरुद्ध कोणतंही आंदोलन करायचं नाही. गांधींनी स्वताही काही केलं नाही आणि एका संघटनेचं आंदोलन स्थगित केलं. 12 फेब्रुवारी 1922 रोजी काँग्रेस कार्यकारिणीचा असा ठराव आहे. त्याची कागदपत्रं आहेत. 1922 ते 1931 पर्यंत सगळी आंदोलनं बंद केली, असा दावाही रणजित सावरकरांनी केला.