Rang Panchmi 2023 : देशभरात रंगपंचमीचा उत्साह; काय आहे या सणाची परंपरा? वाचा महत्त्व...
Rang Panchmi 2023 : रंगपंचमी म्हणजेच रंगांचा सण. धूलिवंदनानंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी सण साजरा केला जातो.
Rang Panchmi Importance : रंगपंचमी (Rangpanchmi) म्हणजेच रंगांचा सण. हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. रंगपंचमी हा सण फाल्गुन कृष्णपक्ष पंचमीला साजरा केला जातो. म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगांची उधळण करत रंगीबेरंगी रंगात न्हाऊन मोठ्या धूम धडाक्यात हा सण साजरा केला जातो. धूलिवंदनापासून वसंतोत्सव सुरु होतो. धूलिवंदनानंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी सण साजरा केला जातो.
रंगपंचमी सण का साजरा करतात?
रंगपंचमी हा सण वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. भगवान कृष्ण द्वापार युगात त्यांच्या संवंगड्यावर उन्हाची रखरख कमी करण्यासाठी पाणी उडवायचे. हीच प्रथा रंगपंचमी म्हणून साजरी करण्यात येते. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची प्रथा चालत आली आहे. आजतागायत ही प्रथा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. देशाच्या कानाकोपऱ्यात हा सण वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
देशभरात रंगपंचमीचा उत्साह
देशभर आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. विविध रंगांची चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यामधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते. रंग उडविण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे असले, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र हा सण होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.
साताऱ्यातील प्रसिद्ध बगाड यात्रा
महाराष्ट्रातील सर्वात मोठं 'बगाड' म्हणून बावधनचं बगाड फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध आहे. रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा (Bagad Yatra) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बावधनची यात्रा म्हणजे, देव भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचा विवाह सोहळा. या विवाह सोहळ्यातील महत्वाचा विधी म्हणजे हळद समारंभ. नाथांच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी या दोन्ही भगिनींना आणलं जातं, अशी या भक्तांची भावना आहे.
कोकणातही रंगपंचमीचा सण
सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या हुडोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. दरवर्षी भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा होणारा 'हुडोत्सव सर्वांसाठी पर्वणीच असते. हा हुडा सागवानी लाकडाचा बनविण्यात आला आहे. घोडेमोडणी हे या हुडोत्सवाचे वेगळेपण आहे. कोलगांव, कुणकेरी, आंबेगावचं रोंबाट होळीच्या सातव्या दिवशी श्रीदेवी भावई, आवेगावचा श्रीदेव क्षेत्रपाल, कोलगांवचा श्रीदेव कलेश्वर हुडोत्सवात सहभागी होतात. तर तीन अवसार या हुड्यावर चढतात, यावेळी खाली जमलेल्या भक्तगणांच्या अफाट गर्दीतून या अवसारावर दगड मारण्याची प्रथा आहे.
सोलापुरात रंगपंचमीचा रंगगाडा उत्सव
सोलापुरात आज रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळेल. लोधी समाजाचा पारंपारिक उत्सव असलेल्या रंगपंचमीचा रंगगाडा उत्सव आज साजरा होईल. मागील दोन वर्षात कोरोनामुळे हा उत्सव साजरा झालेला नव्हता. यंदा मोठ्या उत्साहात लोधी समाज हा उत्सव साजरा करणार आहे. पारंपारिक पद्धतीने शंभर बैलगाड्यांवर रंगाचे आणि पाण्याचे बॅरल ठेवण्यात येतात. शहरातील विविध भागातून या बैलगाड्यांची मिरवणूक निघते. दुपारी 4 वाजता बालाजी मंदिर येथून या रंगगाड्या निघतील.