Rang Panchami 2022 : कोरोनानंतर 'रंगोत्सव'; दोन वर्षांनंतर राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह; प्रसिद्ध देवस्थानांचाही उत्सव
Rang Panchami 2022 : कोरोनाच्या दोन वर्षांनंतर रंगपंचमीसाठी नाशकातल्या पारंपरिक रहाडी सज्ज झाली आहे. प्रसिद्ध देवस्थानांचाही रंगोत्सव.
Rang Panchami 2022 : महाराष्ट्रात अनके ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करत रंग खेळला जातो. मात्र नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, लातूर या भागात होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. नाशिकमधील तीनशे वर्षांची परंपरा असलेला हा ऐतिहासिक पेशवेकालीन रहाड रंगोत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे. मात्र यंदा नाशिकमध्ये डीजे वाजवण्याला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे वादाची शक्यता आहे.
रहाड म्हणजे, भला मोठा भूमिगत हौद. या रंगोत्सवात शहरातील रहाडींमध्ये रंग करून मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो. साईबाबांची शिर्डी आणि विठुरायाच्या पंढरीतही रंगपंचमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. रंगपंचमीनिमित्त साईंच्या सुवर्ण रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दोन वर्षांनंतर प्रथमच सुवर्णरथ मिरवणूक निघणार आहे. तर तिकडे पंढरपूरमध्ये विठुरायाच्या रंगाचा डफ प्रदक्षिणा मार्गावर निघणार आहे. तसंच तुळजापुरात देखील आई भवानीला रंग लावून रंगपंचमीची सुरुवात झाली आहे.
पाहा व्हिडीओ : राज्यभरात रंगपंचमीची धुम, नाशकात 300 वर्ष जुना रहाड रंगोत्सव
नाशिकात रहाड रंगोत्सव
नाशिक शहरातील जुना नाशिक परिसरात पारंपरिक राहाडीमध्ये रंगपंचमी साजरी होणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदा पेशवेकालीन राहाडीमध्ये रंगांचे पाणी टाकून रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. पण या आज रंगपंचमीला नाशिककरांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण पोलीस आयुक्तांनी डॉल्बीला परवानगी नाकारली आहे. केवळ पारंपरिक वाद्य वाजवता येणार आहे.
कोल्हापुरात रंगपंचमीची धूम
कोल्हापुरात रंगपंचमीची धूम पाहायला मिळणार आहे. कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी रंगपंचमीचा सोहळा साजरा केला जाणार आहे. दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळे रंगपंचमी साजरी करता आली नसल्यामुळे यंदा नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
शिर्डीतही रंगोत्सव
साईबाबांच्या शिर्डीत रंगोत्सव साजरा केला जाणार आहे. रंगपंचमीनिमीत्त साईंच्या सुवर्ण रथाची मिरवणूक काढली जाणार आहे. रंगाची उधळण करत हजारो भाविक सहभागी होणार आहेत. दोन वर्षानंतर प्रथमच सुवर्णरथ मिरवणूक निघणार आहे. संध्याकाळी 4 नंतर मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
विठुरायाच्या पंढरीतही रंगोत्सव
विठुरायाच्या रंगांचा डफ निघणार आहे. वसंतपंचमी म्हणजे, देवाच्या विवाहापासून सुरू झालेली देवाची रंगपंचमी आज संपणार आहे. दुपारी देवाचा रंगानं भरलेला डफ प्रदक्षिणा मार्गावर निघणार आहे. यातील रंग अंगावर घेण्यासाठी विठ्ठल भक्त गर्दी करतात. देव स्वतः रंग खेळतो, अशी भावना वारकऱ्यांमध्ये असते.
उस्मानाबादेतही रंगपंचमीचा उत्साह
तुळजापूरात होणार रंगोत्सव. रंगपंचमी निमीत्त रंगाची उधळण करत नागरिक, भक्त तुळजापूरात रंगपंचमी खेळतात. कोरोनामुळे स्थगित झालेली दोन वर्षानंतर रंगपंचमी साजरी केली जाणार आहे.
सोलापूरातही रंगपंचमी
सोलापुरात आज रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. होळी झाल्यानंतर पाचव्या दिवशी रंगाचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. मागील दोन वर्षात कोरोनामुळे सोलापूरकरांना रंगपंचमी अनुभवता आलेली नाही. त्यामुळं रंगपंचमीचा जल्लोष पहायला मिळेल.