Rajya Sabha Election 2022 : कोल्हापूरच्या दोन पैलवानांमध्ये रंगतदार कुस्ती; संभाजीराजेंचं ट्विट चर्चेत
Rajya Sabha Election 2022 : "कोल्हापुरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरू आहे. मला आनंद आहे, कोल्हापुरचाच खासदार होणार." असे ट्वीट संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केले आहे.
Rajya Sabha Election 2022 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या आसपास मतमोजणी होईल असा अंदाज होता. परंतु, अद्याप मतमोजणी सुरू झालेली नाही. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी ट्वीट करून कोल्हापूरच्या दोन पैलवानांमध्ये रंगतदार कुस्ती सुरू असल्याचे म्हटले आहे.
आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत विधानसभेच्या 285 सदस्यांनी मतदान केले. त्यानंतर पाच ते सहा वाजेपर्यंत मतमोजणीला सुरुवात होणार होती. परंतु, महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेत भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि निवडणूक आयोगाने भाजपच्या तक्रारीची दखल घेतील. त्यामुळे गेल्या चार ते पाच तासांपासून मतमोजणी रखडली आहे. या निकालाची सर्व जणच वाट पाहत असताना संभाजीराजे छत्रपती यांनी खास ट्विट केले आहे.
"कोल्हापुरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरू आहे. मला आनंद आहे, कोल्हापूरचाच खासदार होणार." असे ट्वीट संभाजीराजे यांनी केले आहे.
कोल्हापुरच्या दोन पैलवानांची कुस्ती रंगतदार सुरू आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 10, 2022
मला आनंद आहे कोल्हापुरचाच खासदार होणार.
संभाजीराजे यांच्या राष्ट्रपती नियुक्त खासदारकीचा 3 मे रोजी कार्यकाळ संपला. त्यानंतर त्यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. महाविकास आघाडीत सहावी जागा शिवसेनेला मिळाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याची विनंती केली होती. परंतु, संभाजीराजे यांनी शिवसेनेची ही ऑफर स्वीकारली नाही. त्यामुळे सहाव्या जागेवरून चांगलेच राजकारण सुरू झाले होते. शेवटी शिवसेनेने कोल्हापूर शहर प्रमुख संजय पवार यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिली. त्यामुळे स्वाभिमान राखण्यासाठी संभाजीराजे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु, आज निवणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नाव न घेता शिवसेना आणि भाजप उमेदवारांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.