एक्स्प्लोर
कोण कुणाला कॉल करणार?
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठं वक्तव्य केलं आहे.
"युतीचा प्रस्ताव आल्यास यावेळी नक्की विचार करेन", असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं.
राज यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारण एरव्ही 'एकला चलो'चा नारा देणारे राज ठाकरे आता युतीबाबत बोलत असल्यामुळे, ते नेमकं कोणासोबत युती करण्यास उत्सुक आहेत अशी चर्चा सुरु झाली आहे.
प्रस्ताव आल्यास युतीसाठी तयार : राज ठाकरे
यापूर्वी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी फोन न केल्याचा गौप्यस्फोट राज यांनी 'माझा कट्टा'वर केला होता.
विधानसभा निवडणुकीदरम्यान गौप्यस्फोट
यापूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी इच्छुक होतो, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी 'माझा कट्टा'वर 2014 मध्ये केला होता.
शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर मी शिवसेनेसोबत जाण्याची तयारी दाखवली होती. उद्धवशी तसं बोलणंही झालं होतं. त्यासाठी अर्जवाटपही थांबवलं होतं. पण त्यानंतर उद्धवनं प्रतिसादच दिला नाही. साधा फोनही केला नाही. त्यामुळंच सगळं फिसकटलं,' असा खळबळजनक गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2014 मध्ये 'माझा कट्टा'वर केला होता.
राज ठाकरे त्यावेळी (2014) काय म्हणाले होते?
'शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर दैनिक सामनाचे वितरक बाजीराव दांगट माझ्या घरी आले. तुम्ही एकत्र यायला हवं. मी उद्धवशी बोलतो, असं म्हणाले. मी होकार दिला. म्हटलं बोला. त्यानंतर त्याच रात्री दांगटांच्या फोनवरून उद्धवचा फोन आला. विचारपूस झाल्यानंतर उद्धवनं भाजपचा विषय काढला. फसवणूक झाल्याचं म्हणाला. त्यावर मी म्हणालो, मला जे बाहेर राहून कळत होतं, ते तुला आत राहून कळलं नाही. बरं मग आता काय करायचं, असं त्याला विचारलं. त्यानं तीन पर्याय माझ्यापुढं ठेवले. एकतर आपण चर्चा करायची. दुसरं म्हणजे निवडणूक प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायचे नाहीत आणि तिसरा पर्याय निवडणुकीनंतर काय तो निर्णय घ्यायचा.
अर्ज भरायला दोनच दिवस बाकी होते म्हणून पहिल्या पर्यायाची चाचपणी केली. मी लगेचच चर्चेसाठी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची नावं सुचवली. उद्धवने अनिल देसाई आणि दुसरा कोणीतरी चर्चा करेल, असं सांगितलं. अनिल देसाई बाळाला फोन करेल असं उद्धवनं सांगितलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे, २६ तारखेला सकाळी साडेसात, पावणेआठ वाजता स्वत: बाळानेच फोन केला. पण फोन बंद. पुन्हा केला. उचलला नाही. तिसऱ्यांदा उचलला तेव्हा अनिल देसाई म्हणाले, मी फॉर्म भरायला जातोय. दुपारी फ्री होईन. तीन वाजता बोलू. त्यावर बाळाने सांगितलं, आता तुमचं काम आटोपल्यावर फोन तुम्हीच करा.
आम्ही फोनची वाट बघत होतो. दुपारपासूनच राज्यभरातले उमेदवार एबी फॉर्मसाठी माझ्या घराबाहेर जमले होते. पण चर्चा होणार म्हणून मी फॉर्मवाटप थांबवलं. आमच्या पक्षातही उलटसुलट चर्चा सुरू झाली. त्यांना समजेना फॉर्म वाटप बंद का झालं म्हणून? पण चार वाजले तरी फोन नाही. शेवटी मी त्यांचा नाद सोडला आणि फॉर्म वाटून टाकले. म्हटलं मरा, आपलं आपण बघून घेऊ. यापेक्षा आणखी मी काय करायला हवं होतं. म्हणजे यांनी मला झुलवत ठेवून माझ्याच लोकांमध्ये माझ्याबद्दल संशय निर्माण करायचा. मी काय एवढा येडा आहे', असा सवाल राज यांनी केला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
राज यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 2014 मध्ये 'माझा कट्टा'वर विचारण्यात आलं होतं.
त्यावेळी उद्धव म्हणाले, "ज्यांना माझ्या फोनची अपेक्षा आहे, त्यांनी मला मॅसेज किंवा कॉल करा, मी त्यांना रिप्लाय देईन".
उद्धव ठाकरेंना पाठिंबा हवा होता, तर त्यांनी फोन का केला नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता, त्याला उद्धव यांनी उत्तर दिलं.
कोणाशी संपर्क ठेवायचं हे मी जाणतो. ज्यांना माझ्या फोनची अपेक्षा आहे, त्यांनी मला मेसेज करा, मी कॉल किंवा मेसेज करेन असं उद्धव म्हणाले होते. राज-उद्धव एकत्र येणं याबाबत आता मी फुल स्टॉप दिला आहे, त्यानेही दिला आहे आणि तुम्हीही द्या. मी जागेवरच आहे. मी कोणालाही सोडून गेलो नाही. त्यामुळे जे सोडून गेलेत त्यांना हा प्रश्न विचारा असं आवाहन उद्धव यांनी केलं होतं.
संबंधित बातम्या
प्रस्ताव आल्यास युतीसाठी तयार : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement