(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्री तुम्हाला आम्हाला जरी वेळ देत नसले तरी ते शरद पवारांना वेळ देतील, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागूनही ते भेट देत नसल्याचा आरोप केल्यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी स्वागत केलं आहे. तसा दावा राज ठाकरे यांनी त्यांच्या भेटीला आलेल्या प्रकल्पाच्या समर्थकांसमोर केला आहे.
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रत्नागिरी-राजापूर तेलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात सांमजस्याची भूमिका घेण्याचं आवाहन केल्यानंतर त्यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले. त्यात आज राज ठाकरेंच्या भेटीला प्रकल्पाच्या समर्थनार्थ असलेल्या 14 गावातील समर्थक आणि 7/12 असलेले शेतकरी देखील आले होते. त्यांनी राज यांच्या भूमिकेचे स्वागत करताना सर्व हकीगत त्यांच्यासमोर मांडली.
प्रकल्पाला 80 टक्के जणांचा पाठिंबा असल्याचा दावा या मंडळींनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भातलं एक पत्र मुख्यमंत्र्यांसोबत शरद पवार यांना देखील पाठवले आहे. त्यांनी या भूमिकेचं स्वागत केलं असून शरद पवार स्वत: मुख्यमंत्र्यांशी नाणार संदर्भात बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आलेल्यांना सांगितले.
यावेळी प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागूनही ते भेट देत नसल्याचा आरोप केल्यानंतर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला. राज ठाकरे प्रकल्प समर्थकांना म्हणाले, मुख्यमंत्री तुम्हाला, आम्हाला जरी वेळ देत नसले तरी ते शरद पवारांना देतील. कारण सरकार त्यांच्यावरच अबलंबून आहे. सध्याची परिस्थिती बदलायची असेल तर हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर न जाणं महत्त्वाचं आहे.
कोकणातील प्रकल्पांचा स्थानिकांना फायदा व्हावा
कोकणातील पर्यटनावर जोर देत तेथील विकास केला पाहिजे. सध्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्या आहेत. त्यात ज्यांच्याकडे रोजगार नाही त्यांना या प्रकल्पाचा फायदा होईल. आताची परिस्थिती बघता नाणारचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं परवडणारं नाही. त्यामुळे आताची परिस्थिती बघता त्याला पाठिंबा दिल्याचं राज यांनी प्रकल्प समर्थकांसमोर सांगितलं.
कोकणात प्रकल्प आणताना पर्यटनाला चालना मिळावी त्याचसोबत त्याचा फायदा स्थानिकांना व्हावा याकडेही राज ठाकरेंनी लक्ष वेधले. त्याचसोबत पर्यटनावर राज्य सरकारने विशेष लक्ष द्यावे असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
International Women's Day 2021 | घोड्यावर स्वार होऊन महिला आमदार विधानसभेत येतात तेव्हा...
राज ठाकरेंना भेटीला मोठ्या प्रमाणात प्रकल्प समर्थकांची गर्दी बघायला मिळाली. यावेळी नाणार प्रकल्प समर्थनार्थ कृती समितीचे अॅडव्होकेट शशिकांत सुतार यासंदर्भात भाष्य केलं. 80 टक्के नागरिक हे प्रकल्पाच्या समर्थनार्थ आहेत असा दावा त्यांनी यावेळी केला. त्याचसोबत 14 गावांपैकी केवळ 2 गावांचाच या प्रकल्पाला विरोध असल्याचंही सुतार म्हणालेत.
प्रकल्पातील 10 हजारपैकी साडे आठ हजार जागा स्थानिकांची असून त्या सर्वांचा या प्रकल्पावर पाठिंबा असल्याचं उपस्थित समर्थकांनी दावा केला त्याचसोबत आम्ही जमीनी देण्यास तयार असल्याचंही निक्षून सांगितलं.