Raj Thackeray Bhide Wada : सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीला भिडे वाड्याचं स्मारक तयार असेल हे पाहा; राज ठाकरेंचं सरकारला पत्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भिडे वाड्याचं स्मारक लवकरात लवकर करा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. त्यांनी पत्राच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.
Pune Bhide wada : पुण्यातील (pune) भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा (bhide wada) दर्जा द्या, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. अनेक नेत्यांनी आतापर्यंत या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भिडे वाड्याचं स्मारक लवकरात लवकर करा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना केली आहे. त्यांनी पत्राच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.
यंदाच्या अधिवेशनात पुणे शहरातील भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाचे पुढील दोन महिन्यात भूमिपूजन करण्याची तयारी करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातील बैठकीत दिली होती. तर वॉर फुटिंगवर काम करुन मनपा आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी तातडीने नियोजन करुन हे काम मार्गी लावावे, असा आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. घोषणा दिल्या जातात. मात्र कृती शून्य असते, असा अनेक वर्षांपासूनचा अनुभव असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंनी पत्रात काय लिहिलं आहे?
महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यातल्या भिडे वाड्यात रोवली, त्या वास्तूचं राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा सरकारने या अधिवेशनात केली, त्याचं स्वागतच. पण अशा घोषणा पुष्कळदा होतात, पण कृती शून्य होते हा पूर्वानुभव आहे. म्हणून माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, अजून एक रखडलेलं स्मारक अशी ह्याची अवस्था होणार नाही याची काळजी घ्या आणि सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीला हे स्मारक तयार असेल हे पाहा', असं राज ठाकरे यांनी पत्रात लिहिलं आहे.
छगन भुजबळांच्या पाठपुराव्याला यश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेत लवकरात लवकर भिडे वाड्याच्या स्मारकाच्या भूमिपूजनाची तयारी करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मागील अनेक महिन्यांपासून माजी मंत्री छगन भुजबळ या भिडे वाड्याचं स्मारक होण्यासाठी पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात सुरु केली आणि स्त्री शिक्षणाचे बीज हिंदुस्थानात रोवले असणे, शुद्रातिशूद्र समाजासाठी ज्ञानाची कवाडे खुली करुन शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून त्यानंतर मोठा संघर्ष करुन अनेक महिला शाळा त्यांनी सुरु केल्या. त्याच सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या शाळेची आज दूरवस्था पहावत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले होते.