Rajesh Kshirsagar : मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
Rajesh Kshirsagar : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील कामं तडीस नेऊ. मला निवडणूक लढवायला सांगितली त्यावेळी मंत्रीपदाचा शब्द दिला होता, पण ती पक्षाची पॉलिसी असेल, असे क्षीरसागर म्हणाले.
कोल्हापूर : मला मंत्रीपद मिळालं नाही याची खंत वाटते, मी 38 वर्षे जुना शिवसैनिक आहे. 2014 मध्येही मला डावलण्यात आलं आणि विजय शिवतारे यांना मंत्रीपद दिलं, 38 वर्षे काम करून मंत्रीपद मिळालं नाही ही खंत असल्याची प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. ते आज कोल्हापूरमध्ये बोलत होते. क्षीरसागर यांनी मंत्रीपदी संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली.
त्यावेळी मंत्रीपदाचा शब्द दिला होता
ते म्हणाले की, प्रकाश आबिटकर यांना मंत्रीपद मिळणं क्रमप्राप्त होतं. आम्ही कोल्हापूर शहरातील नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील कामं तडीस नेऊ. मला निवडणूक लढवायला सांगितली त्यावेळी मंत्रीपदाचा शब्द दिला होता, पण ती पक्षाची पॉलिसी असेल. पुढील दोन अडीच वर्षांनंतर मला जबाबदारी देतील असं वाटतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, मला मंत्रीपद मिळालं नाही हे वाईट वाटतं, पॉलिसी डिसीजनमध्ये माझी हार झाली असं म्हणावं लागेल. मला मंत्रीपद मिळालं नाही तरी कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, महायुती सरकारचे लवकरच खाते वाटप होईल, विरोधकांना काही काम राहिलं नाही म्हणून ते टीका करत असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला
दरम्यान, मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याचे सांगत आभार मानले. मला चांगली संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादामुळेच शिवसेनेला कोल्हापुरात पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं. सहा आमदार असताना देखील कोल्हापूरला मंत्रिपद मिळालं नसल्याची खंत मंत्री आबिटकर यांनी व्यक्त केली. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. त्यांनी सांगितले की, कोल्हापूरकरांनी शिवसेनेला भरभरून दिलं आहे. सहा आमदार आणि दोन खासदार दिले. त्या तुलनेनं कोल्हापूरला शिवसेनेनं काहीच दिलं नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरला मंत्रिपद दिलं. यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिकांना अधिक बळ मिळणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांना संधी मिळाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते कोल्हापुरात दाखल झाले.
इतर महत्वाच्या बातम्या