Raj Thackeray : 90-92 टक्के ठिकाणी सकाळची अजान झाली नाही, मौलवींचं आभार, आता 135 मशिदींवर कारवाई करा: राज ठाकरे
जे कायद्याचे पालन करत आहेत, त्यांना सजा देणार, ताब्यात घेणार आणि जे कायदा पाळत नाहीत त्यांना मोकळीक देणार? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.
Raj Thackeray : पत्रकार परिषद सहा वाजता जाहीर केली होती, पण काही सूचना मला वाटतं आताच जाणं आवश्यक आहे. त्यामुळे वेळ बदलून आता पत्रकार परिषद घेतली. आज सकाळपासून महाराष्ट्राच्या विविध भागातून मला फोन येत आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरुनही अनेक ठिकाणांहून फोन येत आहेत, माहिती मिळत आहे. पोलिसांचे फोन येत आहेत, काही गोष्टी सांगत आहेत. सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना, मनसैनिकांना पोलिस नोटीस पाठवत आहेत, पकडत आहेत, ताब्यात घेत आहेत. ही गोष्ट आमच्याबाबतच का होते हा आमचा प्रश्न आहे. जे कायद्याचे पालन करत आहेत, त्यांना सजा देणार, ताब्यात घेणार आणि जे कायदा पाळत नाहीत त्यांना मोकळीक देणार? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तसेच जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत, निर्णय लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
जवळपास 90-92 टक्के ठिकाणी महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही, सर्व ठिकाणी आमची माणसं तयार होती. त्या मशिदीमधील मौलवींचे मी आभार मानेन. आमचा विषय आहे तो विषय त्यांना समजला. मुंबईचा जो रिपोर्ट आला, त्याप्रमाणे मुंबईत 1 हजार 140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींमध्ये सकाळची अजान 5 च्या आत वाजवली गेली. काल मला विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला, आम्ही सर्व मौलनींशी बोललो, सकाळची अजान लावणार नाही असं त्यांनी सांगितलंं. आता ज्या 135 मशिदींनी अजान लावली त्यांच्यावर कारवाई होणार का? की आमच्याच पोरांना उचलणार? असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला.
हा विषय केवळ आमचा नाही, क्रेडिटचा विषय नाही. हा समाजाचा विषय आहे. मला क्रेडिट नको. आम्ही गोष्टी सांगितल्या, त्या अनेक मौलवींना समजला, सरकारमध्ये पोहोचला. पोलिसांनाही धन्यवाद, त्यांनाही नीट समजलं. हा सर्वसमावेशक प्रयत्न होता, लोकांना जो त्रास होतो तो बंद होईल ही अपेक्षा. केवळ मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न आहे असं नाही, मंदिरावरील भोंग्यांचाही त्रास होत असेल तर तो बंद व्हायला हवा असेही ठाकरे म्हणाले.