एकगठ्ठा मुस्लिम समाजाने मोदी -शहांविरोधात मतदान केलं, मविआला झालेलं मतदान ठाकरे-पवारांच्या प्रेमाखातर नाही : राज ठाकरे
देशातील एकगठ्ठ मुस्लिम समाजाने मोदी -शहांविरोधात मतदान केलंय. मात्र आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार हा राग नक्कीच काढतील, असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलाय.
Nagpur News नागपूर : लोकसभेच्या (Lok Sabha Election Results 2024) वेळी जे काही मतदान झालं ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. देशातील एकगठ्ठ मुस्लिम समाजाने मोदी-शहांविरोधात मतदान केलं. तसेच भाजपने दिलेल्या अबकी बार 400 पार च्या नाऱ्यावरुन संविधान बदलणार, अशी वक्तव्य त्यांच्याच नेत्यांनी केली आणि त्यानंतर एक वेगळं वातावरण तयार झालं. त्यामुळे एकगठ्ठ दलित समाजानेही भाजप विरोधात मतदान केलं. अँटी मोदी, अँटी शहा प्रकारचे हे मतदान होतं. महाविकास आघाडीला झालेला मतदान हे काही शरद पवार (Sharad Pawar) किंवा उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) प्रेमापोटी झालेले मतदान नव्हतं. त्यामुळे ती जी वाफ होती ती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस निघाली.
आता विधानसभेच्या वेळेस जे काही राजकारण आणि एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू, या राजकारणाला लोक विसरलेले नाहीत. ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं असं म्हणतो, तीच या महाराष्ट्रात झालीय. अशी परिस्थिती गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत बघितली नाही. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार हा राग नक्कीच काढतील, असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर देखील निशाणा साधला. ते नागपूर येथे बोलत होते.
फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली- राज ठाकरे
राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार हेच जबाबदार आहेत. हे मी याआधी पण माझ्या जाहीर सभेतून बोललो आहे. कारण या प्रकारच्या राजकारणाला शरद पवारांनीच महाराष्ट्रात सुरुवात केली. त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले, त्यातून नारायण राणे, छगन भुजबळ इत्यादींसारखे नेते बाहेर पडले. त्यानंतर जातीचा विष देखील राज्यात शरद पवारांनीच कालवलं. 1999 साली ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यानंतरचा महाराष्ट्र आणि त्या आधीचा महाराष्ट्र जर का आपण बघितला, तर ही परिस्थिती लक्षात येईल. यापूर्वी महापुरुषांची विभागणी कधीही जातीपाती झाली नव्हती. आमचे संत कधी आडनावांनी ओळखले जात नव्हते. संत आपल्याकडे संत म्हणूनच बघितले जात होते. या सर्व गोष्टी राज्यात सुरू झाल्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतरच झाल्या असल्याचा घणाघात देखील राज ठाकरे यांनी केलाय.
राज्यात मनसेसाठी पोषक वातावरण - राज ठाकरे
महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, आम्ही त्यात येतं नाही. मात्र आगामी काळात त्यांच्यात तिकीट वाटपावरून इतक्या हाणामाऱ्या होतील की पक्ष बेजार होतील. एक झलक आपण लोकसभेच्या वेळी बघितली. प्रत्येकालाच निवडणुकीसाठी उभं राहायचं असल्याचे चित्र सध्या त्यांच्याकडे दिसत आहे. असेअसले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी राज्यात पोषक वातावरण आहे. गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात जो काही खेळ झाला, त्या सगळ्या खेळीला आता लोक कंटाळले आहेत. त्यामुळे राज्यात अधिकाअधिक जागा आम्ही लढणार असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या