Raj Thackeray : महाराष्ट्र दिनी 'राज'सभेकडे लक्ष; राज ठाकरेंची तोफ औरंगाबादेत धडाडणार
Raj Thackeray Aurangabad Rally Sabha Live : आज महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.महाराष्ट्र दिनी होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.
Raj Thackeray Aurangabad Rally Sabha Live : आज महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. काल राज ठाकरेंच्या प्रवासादरम्यान मनसैनिकांनी त्यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं. काल पुण्याहून निघण्याआधी राज ठाकरेंच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर शेकडो पुरोहित जमले होते.. चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे जवळपास 100 ते 150 पुरोहितांनी राज ठाकरेंना आशीर्वाद दिले. वाटेत राज ठाकरे यांनी वढू गावात छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यानंतर राज यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहारही अर्पण केला.
मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या आज औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. काल सकाळपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांनी या दौऱ्याची आखणी करण्यात आली होती. औरंगाबादच्या सभेआधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मनसेनं केला. पुणे ते औरंगाबाद प्रवासात राज ठाकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागतही केलं गेलं.
महाराष्ट्र दिनी होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता त्याच मैदानावर राज ठाकरे यांची सभा होतेय. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवलाय. तसंच ते भोंगे उतरवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे आता राज ठाकरे आज कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरी तोफ कुणावर धडाडणार याची उत्सुकता लागलीय.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेमुळे मनसे विरुद्ध शिवसेना संघर्षाची झलकही पाहायला मिळतेय. हिंदुत्वावरून दोन्ही पक्षांत स्पर्धा सुरु झालीय. त्यामुळे मनसेच्या बॅनरच्या बाजूला शिवसेनेनं बॅनर लावून शिवसेनेला उत्तर दिलंय. खरे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब अशा आशयाचे बॅनर शिवसेनेनं लावले आहेत. औरंगाबादमधल्या 10 चौकांत मनसेच्या बॅनरच्या बाजूला शिवसेनेनं बॅनर लावून उत्तर दिलंय.