(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raigad Talai Update : रायगड, रत्नागिरीत पावसाचा हाहाकार! तिन्ही सैन्यदले पूर पीडितांच्या मदतीसाठी तैनात
पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यासाठी एनडीआरएफ,आर्मीची पथके, हवाई दलआणि नौदल दाखल झालं आहे. पुण्याहून आर्मीची पथके रत्नागिरीकडे रवाना झाली आहेत.
मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आता सरकारच्या मदतीसाठी तिन्ही सैन्यदले धावली आहे. पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतकार्यासाठी एनडीआरएफ,आर्मीची पथके, हवाई दलआणि नौदल दाखल झालं आहे. पुण्याहून आर्मीची पथके रत्नागिरीकडे रवाना झाली आहेत. तर नौदलाची पथकं कालच दाखल झाली आहे.
लष्कराने पूरग्रस्तांसाठी 14 टास्क फोर्स रत्नागिरी येथे पाठवल्या आहेत. तर हवाईदलाने 17 हेलिकॉप्टर्स मदतीसाठी पाठवले असून नौदलाची चिपळूणमध्ये पाच, महाडमध्ये दोन पथकं दाखल झाली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज सकाळी पुण्यातील औंध मिल्ट्री स्टेशन आणि इंजिनिअरिंग टास्क फोर्स बीईजी सेंटर येथून लष्कराच्या 14 टास्क फोर्स रत्नागिरीसाठी रवाना झाल्या आहेत. पूरात अडकेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे तसेच वैद्यकिय मदतीसाठी रवाना झाले आहे. एका हेलिकॉप्टरने चिपळूणहून अडकलेल्या दोन लोकांना बाहेर काढले तर दुसर्या हेलिकॉप्टरने 10 जणांना बाहेर काढल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे. आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टींग सुरू करण्यात आली आहे.
महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर जावे, म्हणजे हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सततच्या पावसामुळं सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यात सर्वात मोठी दुर्घटना ही तळीये गावात घडली असून या घटनेने हाहाकार माजला आहे.
रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.