'ऑस्कर'ची उत्कृष्ट कामगिरी; महाडमधील महिला सरपंच हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी पकडण्यात यश
Raigad News : पोलीस दलातील ऑस्करनं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महाडमधील महिला सरपंच हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं असून यामध्ये ऑस्करचा मोलाचा वाटा आहे.
Raigad News : पोलीस दलातील श्वानांची बात काही औरच... ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांची चपळतेची तोडच नाही. गुन्हेगाराचा मागोवा घेण्यात यांचा हात कुणीच धरु शकत नाही. यापूर्वीही आपण अनेक सराईत गुन्हेगारांना श्वानांच्या मदतीनं पकडण्यात यश आल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत. असचं एक उदाहरण म्हणजे, ऑस्करनं केलेली यशस्वी कामगिरी. पोलीस दालतील ऑस्कर या श्वानानं महाड तालुक्यातील आदीस्ते गावातील महिला सरपंच मीनाक्षी खिडबिडे यांच्या खुन्याला पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
रुफस, डस्टी, रॉकी आणि ऑस्कर या श्वानांचा रायगड जिल्ह्यातील बॉम्ब शोधक पथकामध्ये समावेश करण्यात आला आहे. यातील, ऑस्कर या डॉबरमॅन प्रजातीतील सात महिन्यांच्या श्वानाचा बिडीडीएस पथकात समावेश करण्यात आला आणि त्याला पुणे येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये सुमारे नऊ महिने ट्रेनिंग दिलं. त्यानंतर गुन्ह्यांच्या तपासासाठी ऑस्करचा पथकामध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, महाड तालुक्यातील आदीस्ते गावातील महिला सरपंच मीनाक्षी खिडबिडे यांची जंगली भागात हत्या करून आरोपी फरार झाल्यानं त्याचा शोध घेण्याचं आवाहन रायगड पोलिसांसमोर होतं.
मीनाक्षी घोरपडे यांच्या डोक्यात वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलीसांना आला होता. यावेळेस बेवारस अवस्थेत सापडलेल्या महिला सरपंच यांच्या मृतदेहापासून काही अंतरावर लाकडी काठ्या आढळून आल्या होत्या. यामुळे, हत्येचा शोध घेण्यासाठी श्वानपथक आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी, बिडीडीएस पथकाला पाचारण करण्यात आलं असता श्वान पथकातील 'ऑस्कर'ची मदत घेण्यात आली होती.
श्वानपथकातील 'ऑस्कर'ला घटनास्थळी सापडलेल्या लाकडाच्या तुकड्याचा वास देण्यात आला आणि त्यानंतर ऑस्करने जवळच असलेल्या गोठ्यातील गुराखीच्या दिशेने धावून हत्यारा आरोपी अमीर जाधव याच्या जवळ जाऊन त्याला पकडण्यात महत्वाची मदत केली आहे. यावेळेस, या आरोपीची शहानिशा केली असता त्यानं महिला सरपंच यांची पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याचं कबूल केलं आहे.
'ऑस्कर' हा बिडीडीएस पथकातील श्वान असून त्यानं रायगड जिल्ह्यातील पोलीस दलाला आरोपी पकडण्यात सतत मदत केली आहे. ऑस्कर हा आज तीन वर्षांचा असून यापूर्वी देखील पेण तालुक्यातील वडखळ येथे झालेल्या हत्येप्रकरणी आरोपीला पकडण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ऑस्करच्या या कामगिरीमुळे पोलीस दलाला आरोपी पकडण्यामध्ये महत्त्वाची मदत झाली आहे. त्यामुळे सर्वच स्तरांतून ऑस्करवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा