(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi : भाजप हिंसा, द्वेष, दहशत पसरवतंय, याविरोधातच भारत जोडो यात्रा; राहुल गांधींचा शेगावात हल्लाबोल
Bharat Jodo Rahul Gandhi Rally: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज शेगावमधील सभेत बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
Rahul Gandhi Speech In Akola Maharashtra : देशात आज भाजपनं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरु केली. या यात्रेचं ध्येय कुणाला काही समजवायचं नाही. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दु:ख समजून घेण्याचा आहे, असं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, 70 दिवसांआधी ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली. समुद्रकिनारी यात्रेला सुरुवात झाली. प्रत्येक दिवशी 25 किलोमीटर ही यात्रा चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र आणि आता महाराष्ट्रात ही यात्रा आली. विरोधकांनी सवाल केला होता की, यात्रेची गरज काय? काय फायदा आहे? राहुल गांधी आज शेगावमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते. सुरुवातीला त्यांनी संत गजानन महाराजांचा जयघोष केला. या भाषणात त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर बोलणं मात्र टाळलं.
राहुल गांधी म्हणाले की, भीती, हिंसा, द्वेषानं तोडलं जातं तर प्रेमानं सर्व जोडलं जातं. भारत जोडोचं ध्येय हे 'मन की बात' करण्यासाठी नाही, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला. हिंसा आणि द्वेषानं देशाला कधीच फायदा होणार नाही.
राहुल गांधींनी म्हटलं की, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. जगाला दिशा देणाऱ्या शिवरायांची ही भूमी आहे. इथे विदर्भातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. विम्याचे पैसे भरुन देखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. काही उद्योगपतींचं मात्र हजारो कोटींचं कर्ज माफ केलं जातं, दोन-तीन उद्योगपती देशाचं कर्ज बुडवत आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
मुलं लाखो रुपए खर्च करुन शिक्षण घेतात. तरीही त्यांना रोजगार मिळत नाही, तरुणांना रोजगार नसलेला भारत आम्हाला नको आहे, असंही ते म्हणाले.
राहुल गांधींकडून गजानन महाराज मंदिरात रांगेत उभे राहत महाप्रसाद ग्रहण
भारत जोडो यात्रेदरम्यान आज राहुल गांधींची आज शेगावमध्ये सभा झाली. सभेआधी राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतलं. राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात रांगेत उभे राहत महाप्रसाद ग्रहण केला. आपले ताट स्वत: उचलून वॉश बेसिनमध्ये नेले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. राहुल गांधी यांना मंचावर पोहोचताच वारकऱ्यांचा फेटा घालण्यात आला. या सभेआधी मनसेनं राहुल गांधींविरोधात निदर्शनं केली. पोलिसांनी शेगावला पोहोचण्याआधीच काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.