अखेर कालीचरण महाराजाला 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Kalicharan Maharaj : महात्मा गांधी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आलेल्या कालीचरण महाराजाला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Kalicharan Maharaj : महात्मा गांधी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आलेल्या कालीचरण महाराजाला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजार रुपये रकमेच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून आपल्या वेगवेगळ्या वक्तव्याने चर्चेत आलेल्या प्रसिद्ध कलीचरण महराजाला पुणे पोलीसांनी काल ताब्यात घेतलं होतं. काल कोर्टात हजर केल्यानंतर कालीचरण महाराजाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर काल एक दिवसाची पोलीस कोठीडी संपल्यानंतर कलीचरण महराजाला पुन्हा कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. त्यात कलीचरण महाराजाला अगोदर सात दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, त्यानंतर लगेच वकिलांनी जामीनासाठी अर्ज न्यायालयाकडे केला होता त्यानुसार आज कालीचरण महाराजाला पुणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कालीचरण महाराजाच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुरुवारी पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदिन यांच्या न्यायालयात जामीना करिता अर्ज केला होता. बचाव पक्षाकडून अमोल डांगे यांनी हा अर्ज सादर केला. त्यावर सरकार पक्षाकडून वकील श्रीधर जावळे यांनी लेखी म्हणणे सादर केले. आज कोर्टाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
कालीचरण महाराज आहे तरी कोण?
'कालीचरण महाराज' अकोल्यातील जूने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये 'भावसार पंचबंगला' भागात राहतो. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजाची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाही. त्याचं मूळ नाव 'अभिजीत धनंजय सराग' असं आहे. लहानपणी अभिजीत अत्यंत खोडकर होता. शिक्षणाचे आणि अभिजितचे सख्य फारसं जमले नाही. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. घरच्या मंडळींना तो शिकावा आणि काहीतरी वेगळं काम करावे असे वाटायचे. मात्र, या परिस्थितीतही त्याचा अध्यात्मावरचा विश्वास आणि ओढा वाढत गेला. पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. पुढे लोकांनी त्यांना 'महाराज' असे संबोधने सुरू केले. या कालिचरण महाराजाने 2017 मध्ये अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवाचे तोंड पाहावे लागले.
शिवतांडव स्त्रोत गायल्याने झाली होती देशभरात ओळख
जवळपास दीड वर्षांपूर्व कालीचरण महाराजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत कालीचरण महाराजाने तन्मयतेने सुंदरपणे शिवतांडव स्त्रोत गायले होते. एका तरुण साधूने गायलेल्या या शिवतांडव स्त्रोतामुळे कालीचरण महाराज अधिक प्रसिद्ध झाला. मध्यप्रदेशातील भोजपुर येथील एका शिवमंदिरात हे 'शिवतांडव स्त्रोत' गायलं होतं. या व्हिडिओनंतर महाराजाची लोकप्रियता प्रचंड वाढली होती.
निवडणुकीच्या रिंगणात कालीचरण महाराज
कालीचरण महाराजाने २०१७ मध्ये झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं होतं. मात्र, कालीचरण महाराजाचा या निवडणुकीत पराभव झाला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघातून त्यांच्या उमेदवाराची मोठी चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी ही निवडणूक लढवली नाही.