Pune-Satara Highway Toll Tax: कामाची बोंबाबोंब, वसुली मात्र जोरात! पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर आजपासून टोलमध्ये पाच टक्के वाढ
Pune-Satara Road Toll Tax : पुणे आणि सातारा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची सदोष बांधणी, सर्व्हिस रोड आणि इतर सुविधांच्या नावाने बोंबाबोंब असताना या रस्त्यावर आजपासून पाच टक्के टोल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : गेली आठ वर्ष काम रखडलेल्या पुणे आणि सातारा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर आजपासून टोलमध्ये पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. या रस्त्याचे काम 31 मार्च 2013 ला पूर्ण केले जाईल असा करार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्त्याचे काम करणार्या रिलायन्स इन्फ्रा या कंपनीमध्ये झाला होता. कालच याला आठ वर्ष पूर्ण झाली. मात्र अनेक ठिकाणी रखडलेले काम, अनेक ठिकाणी रस्त्याची सदोष बांधणी, सर्व्हिस रोड आणि इतर सुविधांच्या नावाने बोंबाबोंब असताना या रस्त्यावर आजपासून पाच टक्के टोल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे आणि सातारा दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग 31 मार्च 2013 रोजी बांधून पूर्ण होणं अपेक्षित होता. तसा करार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि हा रस्ता बांधणाऱ्या रिलायन्स कंपनीमध्ये झाला होता. मात्र या कराराला आज आठ वर्ष पूर्ण होत असताना देखील हा रस्ता अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी हा रस्ता बांधणाऱ्या कंपनीला ॲक्सेस बँकेने कर्ज न दिल्याने रस्त्याचे काम रखडल्याचे कारण दिले. परंतु टोलच्या माध्यमातून वसूल होणारा पैसा रस्ते बांधणीसाठी का वापरण्यात आला नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे. शेकडो कोटी रुपये खर्च होऊन, टोलमधे वेळोवेळी वाढ होऊन देखील अजूनही रस्त्याचं काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे तर अनेक ठिकाणी रस्त्यांची बांधणी चुकल्याने तिथं सातत्यानं अपघात होत आहेत.
काय झाला होता करार
पुणे आणि सातारा दरम्यानच्या 115 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा कंपनीदरम्यान जो करार झाला होता त्या करारानुसार 31 मार्च 213 मध्ये या रस्त्याच्या सहापदरीकरणाचं संपूर्ण काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. या कामामध्ये बाजूचे सर्व्हिस रोड, उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर यासारख्या कामांचाही समावेश होता. परंतु कराराची मुदत संपून तब्ब्ल आठ वर्ष होत असतानाही हा रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही आणि या रस्त्यावरून प्रवास करणारे अजूनही जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.
मागील आठ वर्ष पुणे आणि सातारा दरम्यानचा हा राष्ट्रीय महामार्ग कधीतरी काम पूर्ण होऊन या वाहतूक कोंडीतून सुटका होईल या प्रतीक्षेत आहे. रस्त्याची बांधणी चुकल्यानं, सर्व्हिस रोडचं नसल्यानं, उड्डाणपुलाची कामं राखडल्यानं 120 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची तर गणतीच नाही . मागील आठ वर्षांमध्ये या सगळ्यांमध्ये सुधारणा होण्याऐवजी रस्त्याची अवस्था अधिकच खराब होत गेली आहे.
या रस्त्याचं काम वेळेत पूर्ण न केल्यानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मागे रिलायन्स इन्फ्रा कंपनीला तब्बल पासष्ट कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र त्यापैकी वसूल मात्र एक रुपयाही करण्यात आला नाही. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ता बांधणाऱ्या कंपनीला कर्ज देणाऱ्या एक्सिस बँकेने पतपुरवठा बंद केल्यानं रस्त्याचं काम रखडल्याचं कारण दिलं होतं. मग टोलच्या माध्यमातून जे पैसे वसूल केले गेले ते कुठं गेले असा सवाल विचारला जातोय.
या महामार्गावर पुण्यातील नवले पुलाचा भाग असेल किंवा सातारा जिल्ह्यातील खंडाळा घाटाचा परिसर या ठिकाणी सातत्याने अपघात होऊन शेकडोंचे आतपर्यंत प्राण गेलेत. या ठिकाणी रस्त्याची बांधणीच चुकल्याने सातत्याने अपघात होत आहेत असं संस्थांच्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. मात्र इथल्या रस्त्यांची रचना अजूनही बदलण्यात आलेली नाही. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अर्धवट राहिलेली कामं हे चित्र या रस्त्यावरून प्रवास करणारे वर्षानुवर्षे अनुभवतायतच आणि नजीकच्या काळात त्यात बदल होण्याची चिन्हंही नाहीत. आठ वर्ष एखाद्या राष्ट्रीय महामार्गाचे कामही पूर्ण होऊ शकत नसेल तर तो रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणण्याच्या लायकीचा उरतो का? हा प्रश्नच आहे.