Pune Crime news : पांघरुणासाठी दिलेली चादर आरोपीने कापली अन् बाथरुमध्ये गळफास घेतला; विश्रामबाग पोलिसांच्या लॉकअपमध्येच आरोपीने संपवलं आयुष्य
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस कोठडीत चोरीच्य गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Pune Crime news : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यात दहशत माजवणे, हत्या आणि चोरींच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस कोठडीत चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाजी उत्तम गरड असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना आज (17 मे) सकाळी 6 वाजता उघडकीस आली.
शिवाजी गरड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. युनिट सहाच्या पथकाने त्याला हडपसर परिसरातील एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने शिवाजी गरड याला हडपसर परिसरातील एका चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. त्याला विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये रात्री ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याने लॉकअपमध्ये पाहिलं आणि त्यांना शिवाजी गरड हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
पांघरुणासाठी दिलेल्या चादरीचा काठ कापून त्याच्या साहाय्याने त्याने गळफास घेतला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
रात्रीच केलं होतं लॉकअप...
चोरीच्या गुन्ह्यामुळे शिवाजी गरड याला रात्री लॉकअपमध्ये बंद करण्यात आलं होतं. मात्र रात्रीच त्याने पांघरुणासाठी दिलेल्या चादरीचा काठ कापून बाथरुममध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. सकाळी हा सगळा प्रकार कर्मचाऱ्याने पाहिला आणि सगळीकडे खळबळ उडाली होती. पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाला असल्यास त्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) जातो. त्याप्रमाणे या घटनेची माहिती सीआयडीला देण्यात आली आहे. तसेच अशा घटनेतील आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन तहसीलदारांच्या उपस्थितीत व्हिडीओ शूटिंग करुन केले जाते. त्यानुसार शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
नैराश्येतून सर्वसाधारण लोकांच्या आत्महत्येत वाढ
सध्या पुणे शहरात आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. क्षुल्लक कारणावरुन अनेक तरुण आत्महत्येचं पाऊल उचलताना दिसत आहेत. कोरोनानंतर अनेक विद्यार्थी नैराश्यात आहेत. सोशल मीडियामुळे नैराश्य वाढत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेकांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य जास्त प्रमाणात जपावं, असं आवाहन तज्ञांनी केलं आहे. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.