Ajit Pawar On pune Metro: पुणे मेट्रोत जादुचे प्रयोग अन् वाढदिवस, मात्र कामाला गती नाही; अजित पवारांचा हल्लाबोल
पुण्यातील मेट्रोचा वापर हा वाढदिवस आणि बाकी समारंभ साजरा करण्यासाठी होत आहे. मात्र मेट्रोच्या कामाला हवी तशी गती मिळत नाही आहे, अशी टीका विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
Ajit Pawar On pune Metro : पुण्यातील मेट्रोचा (Pune metro) वापर हा वाढदिवस आणि बाकी समारंभ साजरा करण्यासाठी होत आहे. मात्र मेट्रोच्या कामाला हवी तशी गती मिळत नाही आहे, अशी टीका विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी केली आहे. पुण्यातील मेट्रोमध्ये चार वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजर कारण्यात आला. त्यामुळे अजित पवारांनी ही टीका केली आहे. त्यांच्यासोबतच पुणे मेट्रोवर नेटकरीदेखील संतापले आहेत. मेट्रो का सुरु केली तेच कळत नाहीये? फॅशन शो, वाढदिवस आणि सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. पण मुळात जे करायला पाहिजे ते होतच नाहीये, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्यात सुरु झालेली मेट्रो नागरिकांसाठी काही कामाची नसल्याचे सांगत पुणे मेट्रोचा उपयोग शाळकरी मुलांच्या सहलीसाठी, वाढदिवस साजरे करण्यासाठी, जादूचे प्रयोग करण्यासाठी होत असल्याची टीका करत पुणे मेट्रोसह रिंग रोडच्या कामाला गती देण्याची मागणी त्यांनी केली.
पुणे मेट्रोच्या कामाला गती मिळावी...
पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या मेट्रोच्या कामात भूसंपादनाचा सर्वात मोठा अडथळा महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही दूर केला. ‘पीएमआरडीए’ मार्फत करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन या प्रकल्पाचे भूसंपादनाचे सर्व प्रश्न सोडवून शंभर टक्के जागा ताब्यात घेतली. राजभवन, कोर्टाची जागा, एलआयसी, पुणे वेधशाळा, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण कार्यालय, गर्व्हमेंट पॉलिटेक्निक पुणे येथील मेट्रोसाठी लागणाऱ्या जागांचा ताबा दिला. पुणे मेट्रोसाठी सर्वात महत्वाची असणाऱ्या कामगार पुतळ्याजवळील राजीव गांधी झोपडपट्टीच्या जागेचे स्थानिकांचे प्रश्न सोडवत भूसंपादन केले. मेट्रोच्या विस्तारात चिंचवड ते निगडी, कात्रज ते स्वारगेट इत्यादिंचे प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवून त्याचा सातत्याने आढावा घेतला. या कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतुद अर्थसंकल्पात केली. मात्र सध्या पुण्यात सुरु झालेली मेट्रो पुणेकरांच्या उपयोगाची नाही. शाळकरी मुलांच्या सहली, वाढदिवस आणि जादूचे प्रयोग करण्यासाठी पुणे मेट्रोचा उपयोग होत आहे. त्यामुळे पिंपरी ते निगडी, वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी, खडकवासला ते स्वारगेट या जोड मार्गिकांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आणि प्रस्ताव सादर केला. राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करुन हा प्रश्न सोडवावा.
विविध विकासकामे तातडीने मार्गी लावा...
पुणे शहरात कृषी भवन, शिक्षण आयुक्तालय, सहकार भवन, कामगार भवन, नवीन प्रशासकीय इमारत, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, नवीन पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण कार्यालय, नोंदणी भवन, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे नवीन प्रशासकीय भवन, बंड गार्डन पोलीस स्टेशनसाठी जागा, पिंपरी-चिंचवड येथील नवीन पोलीस आयुक्तालयाची जागा तसेच साखर संग्रहालयासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतुद महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आली आहे. आता या कामाला गती देण्याची गरज.
पुणे-नाशिक रेल्वे महत्वाची…
पुणे आणि नाशिकच्या कनेक्टिविटीसाठी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात 800 कोटी रुपयांची तरतुद करुन 90 टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. या पुणे-नाशिक रेल्वेचा पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतुकीसाठी फायदा होणार आहे.