अजित पवारांनी फक्त स्वप्न पाहावे, ते कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत; विजय शिवतारेंचा हल्लाबोल
अजित पवार मुख्यमंत्री होणं कधीही शक्य नाही आहे. मुख्यमंत्री व्हायची त्यांनी स्वप्न पाहावीत, असा घणाघात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे.
Vijay Shivtare : अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे हे कधीही शक्य नाही आहे. मुख्यमंत्री व्हायची त्यांनी फक्त स्वप्न पाहावीत. ते मुख्यमंत्री होणार नाहीत, अशा शब्दात माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी हल्लाबोल केला आहे. ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बोलत होते. 1978 पासून आजपर्यंत पवार साहेबांना जनतेने कधीही पूर्ण बहुमत दिले नाही. दोन ते तीन जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रभाव आहे. त्याचं कारण सहकार आहे. त्यामुळे लोक त्यांच्या सोबत असतात. ते सत्तेचा गैरवापर करतात, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे. आज विजय शिवतारे हे इंदापूरमध्ये संघटनात्मक बैठक घेण्यासाठी आले होते. तेव्हा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली.
अजित पवार यांच्यासारखा व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असल्यास राज्याचा नक्कीच फायदा होईल, असं वक्तव्य कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. अजितदादांकडे असलेल्या अनुभवामुळं राज्यातील नागरीकांना योग्य वेळी निर्णय घेतल्याचा फायदा होईल असेही रोहित पवार यावेळी म्हणाले होते. त्यावर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी सरकार तरी टीकेल का?; चंद्रकांत पाटील
यावर बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील भाष्य केलं होतं. लोकशाहीत मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, अशी इच्छा व्यक्त करायला हरकत नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करावं लागेल. त्यासाठी शिवसेना आणि कॉंग्रेसला सोबत घ्यावे लागणार आहे. मात्र 2024 पर्यंत तीन पक्ष सोबत राहतील का?, असा प्रश्न मंत्री चंद्रकांत पाटील त्यांनी उपस्थित केला होता. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. अडीच वर्ष मविआ सरकार असताना ओला दुष्काळ जाहीर केला नाही, याची आठवण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना असायला हवी, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
महात्मा गांधी देश फिरले, सर्वसामान्यांमध्ये वावरले त्यामुळे त्यांच्यासारखे नेते भारताला मिळाले, हे उद्धव ठाकरे आणि माजी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना फार उशिरा कळलं. मातोश्रीवर राहून राज्यातील लोकांचे दुख: कळतात, असं त्यांना वाटत होतं. मात्र आता प्रत्यक्ष दौरे करत असताना त्यांना अनेक गोष्टींचा सक्षात्कार झाला. ही चांगलीच बाब आहे, असंही ते म्हणाले होते.