Pune Crime News : पुण्यातील आठवीतील दोन मुलींना K Pop डान्स क्लबची भुरळ, दक्षिण कोरिया गाठण्यासाठी घरातून पळ काढला पण....
साऊथ कोरियातील एक क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्यातील 13 वर्षीय दोन अल्पवयीन मुलींनी घरातून पळून जण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पुणे आणि मुंबई पोलिसांनी अखेर या मुलींना गाठलं.
पुणे : सध्या तरुणाईला आणि शाळकरी मुलांना मोबईलचं (crime news) वेड लागलं आहे. याच मोबाईलच्या माध्यमातून जगभरातील वेगवेगळ्या गोष्टी मुलं-मुली शिकत असतात. अनेक मुलांना सध्या साऊथ कोरियातील बँडने किंवा क्लबने भुरळ घातल्याचं पाहिलं आहे. अशाच एक क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्यातील 13 वर्षीय दोन अल्पवयीन मुलींनी घरातून पळून जण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पुणे आणि मुंबई पोलिसांनी अखेर या मुलींना गाठून त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवलं आहे. या दोन्ही मुली विश्रांतवाडी येथील शाळेत इयत्ता आठवीत शिकतात.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील दोन अल्पवयीन मुलींना साऊथ कोरियातील डान्स क्लबने भुरळ घातली. त्यामुळे त्यांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांना याबाबत माहिती दिली तर ते नकार देतील त्यामुळे मुलींनी शक्कल लढवली. मुलींकडे पैसे नसल्याने त्या पुण्यातील घर सोडण्यासाठी योग्य मुहूर्ताची वाट पाहत होत्या किंवा पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. त्यांचे कुटुंबीय त्यांना डान्स क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी भारत सोडू देणार नाहीत याची त्यांना कल्पना असल्याने त्यांनी कुटुंबातील सदस्यांना न कळवण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी त्यांच्या आजीने औषधासाठी दिलेले 500 रुपये घेऊन घरातून निघून गेल्या.
त्यानंतर या मुलींनी पुणे स्टेशन गाठलं आणि मुंबईत गेल्या. मुंबईत पोहोचल्यावर त्यातील एकीने आजीला कळवण्याचा विचार केला आणि टॅक्सी चालकाचा मोबाईल वापरुन तिचा नंबर डायल केला. हा सगळा प्रकार पाहून आजी घाबरल्या आणि त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधून विश्रांतवाडी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. या प्रकरणावर तातडीने कारवाई करत स्थानिक पोलिसांनी टॅक्सी चालकाशी संपर्क साधला आणि मुंबईतील मुलींचा शोध घेण्यासाठी त्याची मदत घेतली. चालकाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलींचा माग काढला आणि त्यांना मुंबईतील माटुंगा पोलीस ठाण्यात नेले. पुणे पोलिसांच्या पथकाने मुंबई पोलिसांशी समन्वय साधून मुलींना पुन्हा पुण्यात आणलं आणि त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवलं.
मुलांवर नजर ठेवण्याची गरज...
सध्या शाळकरी मुलं मोबाईलच्या आहारी गेले आहेत. शाळेशी संबंधित आणि बाकी गोष्टी पाहण्यासाठी मुलं सर्रास मोबाईलचा वापर करतात. या माहितीसोबतच मुलांना इतरही फार गरजेची नसलेली माहिती मिळते. देशविदेशात नेमकी कशी संस्कृती आहे. याचीदेखील माहिती मिळते आणि त्यातूनच अशा प्रकारची पावलं उचलली जातात. त्यामुळे पालकांनी मुलांवर नजर ठेवण्याची गरज आहे.
इतर महत्वाच्या बातमी-