(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune koyta gang : आझम कॅम्पस परिसरात कोयता गॅंगचा धुमाकूळ; पुणे पोलीस कारवाई कधी करणार?
पुण्यातील अझम कॅंम्पस परिसरातील हॉटेलबाहेर कोयते घेऊन तरुणांनी दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत.
Pune koyta gang : पुण्यात कोयता गॅंगची (Koyta gang) दहशत कायम असल्याचं बघायला मिळत आहे. रोज अनेक परिसरात कोयता गॅंग सर्रासपणे हल्ले करताना दिसत आहे. पुण्यातील अझम कॅंम्पस परिसरातील हॉटेलबाहेर कोयते घेऊन तरुणांनी दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. यात तरुण रस्त्यावर राडा करत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेलची तोडफोड...
पुण्यातील अझम कॅम्पस परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात अनेल लहान मोठे हॉटेल्स आहेत आणि दाटीवाटीचा परिसर आहे. याच परिसरातील हॉटेलमध्ये शिरुन कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. या कोयता गॅंगची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यांनी हॉटेलची तोडफोडदेखील केली आहे. यात हॉटेल मालकाचं मोठं नुकसान झालं आहे. हॉटेल मालकांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली आहे.
पाच ते सहा लोकांची टोळी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुण्यातील किमान सात ते आठ परिसरात आतापर्यंत कोयता गॅंगने हल्ले केले आहेत. यात अनेक नागरिकांच्या दुकानांचं आणि हॉटेलचं नुकसानही झालं आहे. धमक्या, त्यांच्या दुकानात शिरुन तोडफोड केल्यामुळे नागरिकांना देखील धास्ती बसली आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोड परिसरात रात्रीच्यावेळी कोयता गॅंगने दहशत निर्माण केली होती. त्यानंतर पोलीसांनी या सगळ्यांना भररस्त्यात चोप दिला होता फिल्मी स्टाईल पाठलाग करुन त्यातील एकाला पकडून अटक केली होती आणि त्या धरपकडीत एक पसार झाला होता. त्यानंतर कोयता गॅंगला पकडणाऱ्या पोलिसांंचं कौतुक करण्यात आलं होतं. मात्र शहरात अनेक ठिकाणी परसलेल्या या कोयता गॅंगवर कारवाई कधी होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
पुणे पोलीस काय करताय?
पुण्यात सर्रास कोयते उगारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात कोयता गॅंगची दहशत सर्रास सुरू आहे. शहरातील अनेक मध्यवर्ती तसेच उपनगरात तरुणांकडून भर दिवसा कोयते उगारले जात आहेत. या तरुणांमध्ये अनेक अल्पवयीन तरुण असून गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांमध्ये भीती पसरली आहे. सामान्य नागरिक तसेच व्यापाऱ्यांना धमकवून खंडणी लुटण्याचे प्रयत्न देखील या तरुणांकडून केले जात आहेत. मात्र पुणे पोलिसांकडून कुठलीही कठोर कारवाई या तरुणांवर केली जात नसल्याचं चित्र प्रखरतेने जाणवत आहे.
संबंधित बातमी-
Pune Koyta Gang: कोयता गॅंगची पुन्हा दहशत थांबेना; 5 जणांना पोलिसांनी केली अटक