(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune : कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं अन् 6 दिवसात 6 हजार पुणेकरांनी घेतला 'बूस्टर डोस'
पुण्यात 6 दिवसात 6 हजार नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. पुण्यात आजच (29 डिसेंबर) सिंगापूरहून आलेली 32 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
Pune covid update booster dose : पुणे (pune) शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने पुणेकरांनी काही काळापुरता बुस्टर डोसला (booster dose) राम राम ठोकला होता. अनेक पुणेकरांनी बुस्टर डोसकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र जगभरातील अनेक देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने पुण्यात बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पुण्यात 6 दिवसात 6 हजार नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. पुण्यात आजच (29 डिसेंबर) सिंगापूरहून आलेली 32 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्या महिलेवर घरीच उपचार सुरु आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही चिंता करण्याची गरज नाही तर काळजी घेण्याची गरज आहे, असं मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी सांगितलं आहे.
पुणे शहरात 14 ते 20 डिसेंबरपर्यंत अवघ्या 206 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला होता. गेल्या आठवड्यापासून बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या चांगलीच वाढली आहे. 21 ते 27 डिसेंबर या कालावधीत 6 हजार 723 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून पुणेकरांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून वारंवार करण्यात आलं होतं. मात्र मागील काही महिने पुणेकरांनी बुस्टर डोसकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अनेक देशात कोरोनाचा उद्रेक होताना दिसला. चीनमधील कोरोनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर पुणेकरांनी बुस्टर डोस घेण्यासाठी गर्दी केली.
बूस्टर डोस घेण्यामध्ये 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. शहरात गेल्या 15 दिवसांत 14 ते 27 डिसेंबर या दरम्यान 6929 नागरिकांनी बूस्टर घेतला आहे. यापैकी 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांची संख्या 4936 एवढी आहे. यानंतर 45 ते 60 या वयोगटातील नागरिक बूस्टर घेण्यास पसंती देत आहेत.
आतापर्यंत किती पुणेकरांनी घेतली लस?
पुणे जिल्ह्यात कोविडचे 54 रुग्ण असून रोज 11 रुग्ण बरे होत आहेत. कोविड लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 1 कोटी 93 लाख 45 हजार 470 नागरीकांचं कोविड लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 99 लाख 5 हजार 418 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. 84 लाख 59 हजार 838 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर फक्त 9 लाख 80 हजार 219 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. बूस्टर डोस घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.