Pune Congress Celebration : कानडी जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं अन् काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळवून दिला: प्रशांत जगताप
कानडी जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं अन् काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळवून दिला; प्रशांत जगताप
Pune Congress Celebration : कर्नाटकात (Karnataka Election) काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले असून या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचंड जल्लोष साजरा करण्यात येत आहे. त्यातच पुण्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कर्नाटकचा निकाल ही तर देशात होणाऱ्या बदलाची सुरुवात असल्याचं म्हटलं आहे आणि जल्लोष देखील साजरा केला आहे. सोबतच पुण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हनुमान मंदीरात केली आरतीदेखील केली.
कर्नाटकमध्ये विजय झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, कर्नाटकमध्ये काँग्रेसचा दिमाखदार विजय झाल्याने जनमत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या पराभवासह दक्षिणेतील अखेरचे राज्य देखील भारतीय जनता पार्टीने गमावले आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी, अमित शहा व कर्नाटक राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे,असे मतही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले आहे.
'कानडी जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेसचा ऐतिहासिक विजय'
पुढे बोलताना ते म्हणाले की, एकीकडे देशातील मणिपूरसारखे राज्य दंगलीमध्ये जळत असताना देशाच्या पंतप्रधानांनी मात्र त्या घटनेकडे पूर्णपणे पाठ फिरवत कर्नाटकमध्ये येऊन प्रचार करण्यास पसंती दिली, पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना घेतलेल्या नैतिकतेच्या मूल्यांचा देखील पंतप्रधानांना विसर पडला. केवळ सत्ता आणि सत्ता हेच भारतीय जनता पार्टीचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी जातीय दंगली भडकवणे, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे यांसारख्या कुठल्याही स्तराला ते जाऊ शकतात, हेच या घटनेतून पाहायला मिळाले. पण सरते शेवटी कानडी जनतेने या सर्व गोष्टींचा सारासार विचार करत भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेसला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला आहे, असं त्यांनी म्हटलंय.
"भाजपचं धार्मिक आणि विखारी मुद्द्यांकडे लक्ष"
देशात लोकशाही विरोधात सुरू असलेल्या अनेक घडामोडी, ऑपरेशन लोटस आणि खोट्या ईडी कारवाया करत मिळवलेली सत्ता, महागाई, बेरोजगारी, शेतमालाला हमीभाव या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत केवळ धार्मिक आणि विखारी मुद्द्यांकडे लक्ष वेधत देशातील जनतेला अस्थिर वातावरण देणाऱ्या भारतीय जनता पार्टीसाठी ही मोठी चपराक आहे. येत्या काळात राज्यासह संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीला अशाच प्रकारे सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय, शेतकरी आणि देशातील बेरोजगार तरुण नाकारणार, हेच या विजयातून स्पष्ट होते.