Pune Bypoll Election : महाविकास आघाडीत बिघाडी? अजित पवारांनी आमचं काम सोपं केलं; नाना पटोलेंचा टोला
जागावाटप गुणवत्तेनुसारच झाली पाहिजे. जिथे ज्या पक्षाची ताकद अधिक असेल, तिथे तोच पक्ष लढेल, ही काँग्रेसचीच भूमिका मांडून अजित पवारांनी आमचे काम अधिक सोपे केले आहे', असं नाना पटोले म्हणाले.
Pune Bypoll election : पुण्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरुन रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडून या जागेवर दावा केला जात आहे. यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ज्या पक्षाची जास्त ताकद आहे त्या पक्षाला ही जागा दिली जाणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर महाविकास आघाडीत पेच निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. 'जागावाटप गुणवत्तेनुसारच झाली पाहिजे. जिथे ज्या पक्षाची ताकद अधिक असेल, तिथे तोच पक्ष लढेल, ही काँग्रेसचीच भूमिका मांडून अजित पवारांनी आमचे काम अधिक सोपे केले आहे', असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
‘आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप सूत्र अद्याप ठरलेले नाही. मात्र त्यावरुन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत तू तू मै मै सुरु झाल्याचं बघायला मिळलं. दोघांनीही लोकसभेच्या जागेवर दावा केल्याने महाविकास आघाडीची वज्रमुठ सैल होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी या जागेवर दावा केला होता. त्याचबरोबर मित्रपक्षांमध्ये ज्यांची ताकद सर्वाधिक आहे, त्यांना जागा मिळावी. त्या त्या ठिकाणी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाची माहिती घेतली, की कोणाची ताकद किती आहे, याचा अंदाज येतो, असं ते म्हणाले होते.
मागील अनेक वर्षांपासून पुणे लोकसभेची जागा क़ॉंग्रेसकडेच आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक कॉंग्रेसच्या नेत्यांचा या जागेवर डोळा आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडूनही ही जागा कॉंग्रेसच लढवणार असल्याचं खडसावून सांगितलं जात आहे. पुण्यातील कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी ही जागा आम्हीच लढू, मात्र महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या उमेदवारासंदर्भात निर्णय घेतील, असं म्हणाले आहेत. त्यांच्यासोबतच नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे यांनीदेखील कसबा पोटनिवडणुकीचं उदाहरण देत ताकद असल्याचं सांगितलं आहे आणि जिंकण्याचा विश्वासदेखील व्यक्त केला आहे.
मात्र असं असलं तरीही या जागेवर राष्ट्रवादी मागील काही दिवसांपासून दावा ठोकत आहे. त्यासंदर्भात त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी प्रशांत जगताप यांच्या नावाचे भावी खासदार असा उल्लेख असल्याचे बॅनर्स शहरभर लावले होते. प्रशांत जगताप यांनी पक्षाने संधी दिली तर लोसकभा निवडू असं सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवार यांनी प्रशांत जगताप यांना शुभेच्छादेखील दिल्या होत्या. त्यानंतर आता पुण्याची जागा कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.