ब्लड फेरफार प्रकरणात डॉ. तावरेंवर मोठी कारवाई, शिपायाचंही केलं निलंबन; SIT अहवाल मंत्र्यांकडे सादर
पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी कारवाई संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, डॉ. अजय तावरे यांच्याकडून न्याय वैद्यकशास्त्र विभागप्रमुख चार्ज काढून घेण्यात आला
पुणे : शहरातील कल्याणी नगर पोर्शे कार अपघातप्रकरणी (Accident) पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता प्रशासनानेही कारवाईला सुरुवात केली आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय तावरेंनी रक्त तपासणी अहवालात फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह या कामी मधला माणूस म्हणजेच दलाल बनून काम करणाऱ्या रुग्णालयातील शिपायासही पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी, शासन स्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली असून चौकशी (SIT) समितीने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. डॉ. पल्लवी सापळे यांच्या नेतृत्वात ही समिती काम करत असून पुढील काही तासांत डॉ. अजय तावरेंवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी डॉ. अजय तावरेंकडे असलेला वैद्यकशास्त्र विभागप्रमुखाचा चार्ज काढून घेण्यात आला आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी कारवाई संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, डॉ. अजय तावरे यांच्याकडून न्याय वैद्यकशास्त्र विभागप्रमुख चार्ज काढून घेण्यात आला असून विजय जाधव यांच्याकडे तो चार्ज देण्यात आला आहे. याप्रकरणी, अटकेत असलेल्या शिपाई अतुल घटकांबळेसही निलंबित करण्यात आले आहे. तर, वैद्यकीय क्षेत्रातील दुसरे मुख्य आरोपी असलेले श्रीहरी हळनोर हे तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असल्याने 28 तारखेलाच त्यांची सेवा समाप्त करण्यात आल्याची माहिती विनायक काळे यांनी दिली.
पुणे अपघात चौकशी प्रकरणी जे जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून दोन दिवसांपासून त्या पुण्यातील घटनेचा तपास करत आहेत. त्यासाठी, पुणे पोलीस आणि रुग्णालय प्रशासनासोबतही त्यांचा संवाद झाला आहे. या समितीने अॅक्शन मोडमध्ये येत 48 तासात तपास पूर्ण केला असून ब्लड सॅम्पल अफरातफरी प्रकरणी कारवाईला सुरुवात झाली आहे. ब्लड सॅम्पलप्रकरणात डॉक्टरांनी केलेलं कृत्य गंभीर असल्याने शासनाने गंभीर दखल घेत चौकशीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
अहवाल वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे
ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी तयार करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे यांनी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवातकर यांना सादर केला. आता तो अहवाल वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना देखील प्राप्त झाला. अहवाल प्राप्त झाल्याने तातडीने क्लास वन अधिकारी डॉ.अजय तावरे यांच्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना कळवण्याची प्रक्रिया सुरू आहे तर डॉ. श्रीहरी हरनोळ हे क्लास टू चे रँकचे अधिकरी आहेत. हरनोळ आणि शिपाई घटकांबळे यांची तातडीने शासन स्तरावर आता कारवाई झाली असून डॉ. तावरेंकडीली पदभार काढून घेण्यात आला आहे.
पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली समिती
एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत. याशिवाय, या समितीमध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होते.