'नब्ज' ईदोत्सव-2021 विशेषांकाचे एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते प्रकाशन
खास ईदनिमित्त अशा प्रकारचा साहित्याने मढलेला मराठी विशेषांक ईदोत्सव-2021 नब्ज काढण्याची कल्पना खूपच चांगली आहे. यानिमित्ताने मराठी साहित्य विश्वात एका नव्या परंपरेला सुरुवात होत आहे या शब्दात एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी ब्लॅक इंक मीडियाचा या विशेषांकाचे प्रकाशन करताना कौतुक केले.
मुंबई : महाराष्ट्रातील दिवाळी अंकाच्या परंपरेतून प्रेरणा घेत खास ईदनिमित्त अशा प्रकारचा साहित्याने मढलेला मराठी विशेषांक ईदोत्सव-2021 नब्ज काढण्याची कल्पना खूपच चांगली आहे. यानिमित्ताने मराठी साहित्य विश्वात एका नव्या परंपरेला सुरुवात होत आहे या शब्दात एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी ब्लॅक इंक मीडियाचा या विशेषांकाचे प्रकाशन करताना कौतुक केले. नब्ज या विशेषांकाचे प्रकाशन एबीपी माझाच्या कार्यालयात आज करण्यात आले.
प्रशांत पवार आणि शेखर देशमुख यांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी अशा प्रकारच्या विशेषांकाची कल्पना मांडली आणि ती पूर्णत्वासही नेली. कोरोना काळात साहित्याची वाणवा जाणवत आहे. पुस्तक विक्रीची दुकानेच बंद आहेत असे नाही तर वाचनालयेही बंद असल्याने वाचकांची वाचनाची भूक भागवण्याचे काम काही प्रमाणात किंडल वा ई-बुक करीत आहे. असे असतानाही प्रशांत आणि शेखर या दोघांनी साहस करून या विशेषांकाची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषिक मुस्लिम समुदायाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ईदनिमित्त अंक काढत असलो तरी त्याला धार्मिक रंग येऊ नये असा प्रयत्न केल्याचे प्रशांत पवार यांनी यावेळी म्हटले. दिवाळीत प्रकाशित होणारे अंक हे सगळ्यांसाठी असतात. ते फक्त हिंदूंसाठी नसतात तर मराठी वाचणाऱ्या प्रत्येकासाठी दिवाळी अंक असतात. अगदी तसाच विचार आम्ही हा विशेषांक प्रकाशित करण्यापूर्वी केला होता असेही प्रशांत पवार यांनी सांगितले.
नब्ज या अंकात लेख, कविता, गझलांचा समावेश असून जावेद अख्तर यांच्या ‘प्रत्येक भारतीय हा राष्ट्रवादीच आहे’ या विशेष लेखाने अंकाची सुरुवात होते आणि तेथूनच याचे वेगळेपण जाणवायला लागते. शेखर देशमुख, मुबारक अली, शर्मिष्ठा भोसले, जितेंद्र घाटगे, संतोष आंधळे, श्रृती गणपत्ये, अलीम रंगरेज यांचे लेख असून मुबारक शेख, साबिर सोलापुरी, सदानंद डबीर, शोभा तेलंग, डॉ. राम पंडित आदिंच्या गजलांसह दिशा शेख, साहील कबीर, शमिभा पाटील, सागर कांबळे आदिंच्या कवितांचाही या अंकात समावेश करण्यात आला आहे. तेजस ठाकरे यांच्यावर सह्याद्रीच्या रानावनातले धाकले ठाकरे हा विशाखा शिर्के यांचा लेख आहे. याशिवाय जतिन देसाई, हुमायून मुरसल आणि डॉ. मुफीद मुजावर यांचेही वेगळ्या विषयावरील लेख या अंकाचे साहित्यिक मूल्य वाढवणारे आहेत.