(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उदयनराजेंच्या शपथविधीच्या वादावरुन व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलनं
राज्यसभा सदस्यांच्या शपथविधीच्या वेळी उदयनराजेंच्या जय भवानी जय शिवाजी या उद्घोषावर आक्षेप घेतल्यावरुन राज्यात तीव्र संतापाची लाट दिसून आली. अनेक ठिकाणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात आंदोलने करण्यात आली.
मुंबई : राज्यसभा सदस्यांच्या शपथविधीच्या वेळी उदयनराजेंच्या जय भवानी जय शिवाजी या उद्घोषावर आक्षेप घेतल्यावरुन राज्यात तीव्र संतापाची लाट दिसून आली. अनेक ठिकाणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली. राज्यसभा खासदारांनी काल (22 जुलै) शपथ घेतली. यावेळी भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली होती. "तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या' असं व्यंकय्या नायडू म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्याच्या विरोधात मोठा वाद निर्माण झाला आहे.
राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहामध्ये उदयनराजे यांना घोषणा देण्यापासून रोखल्यामुळे आज राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यासाठी राज्यातील विविध भागांत आंदोलनं करण्यात आली.
पुण्यात युवक राष्ट्रवादी काँग्रेस 20 लाख पत्रे पाठवणार
संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आलं असून शिवसेना पुणे शहराच्या वतीने भाजपाचे राज्यसभेतील सभापती व्यंकय्या नायडू यांनी जय भवानी जय शिवाजी या उद्घोषावर आक्षेप घेतल्या प्रकरणी निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून निषेध आंदोलन करण्यात आलं असून शिवसेना, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आंदोलनासाठी उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ : नाशिकमध्ये भाजप कार्यालयासमोर नायडूंच्या प्रतिमेचं दहन, संभाजी ब्रिगेडचं आंदोलन
नाशकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पत्रप्रपंच
व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात नाशकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पत्रप्रपंचाचा घाट घातला. युवक काँग्रेसच्या माध्यमातून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना 'जय भवानी, जय शिवाजी' लिहून पत्र पाठवण्यात आली. बी पत्र नाशिक मुख्य पोस्ट कार्यालयातून पाठवण्यात आली. तसेच शिवाजी महाराज अवमान प्रकरण नाशकात चांगलचं तापल्याचं दिसून आलं. संभाजी ब्रिगेडच्या वतीनेही भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. तसेच नाशिकमधील शिवसेना कार्यालयाबाहेर व्यंकय्या नायडू यांच्या प्रतिकात्मक पुतळाचं दहन करत शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं.
औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीने आंदोलन
राज्यसभेत नवनिर्वाचित खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदारकीच्या शपथ विधीनंतर 'जय भवानी, जय शिवाजी' अस जयघोष केला. यामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. याचा निषेध करत आज औरंगाबाद शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. व्यंकय्या नायडू आणि भाजपाच्या विरोधात घोषणा दिल्या. औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक सहभागी झाले होते.
पाहा व्हिडीओ : शिवरायांचा अपमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता : उदयनराजे
जालन्यातही व्यंकया नायडू यांच्या विरोधात आंदोलन
उदयनराजे यांच्या शपथविधी दरम्यान त्यांनी दिलेल्या घोषणांवर व्यंकय्या नायडू यांनी घेतलेल्या हरकती नंतर व्यंकय्या नायडू यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. याच निषेधार्त व्यंकय्या नायडू यांना 'जय भवानी जय शिवराय' मजकूर लिहून 20 लाख पत्र पाठवण्यात येत आहेत. जालना येथे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ काकडे यांच्या वतीने व्यंकया नायडू यांचा निषेध करण्यात आला. त्यांनी उदयनराजे यांचा नाहीतर शिवरायांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करत आपला संताप व्यक्त केला. दरम्यान यावेळी या कार्यकर्त्यांनी नायडू यांना पत्र पाठवून निषेध व्यक्त केला.
राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेकडून व्यंकय्या नायडू यांचा निषेध करण्यात आला. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत व्यंकय्या नायडू यांनी माफी मागावी, अन्यथा ते जिथे जातील तिथे त्यांना आमच्या रोषाचा मुकाबला करावा लागेल. भाजपच्या मनात छत्रपतींच्या नावाची अॅलर्जी असल्याचं म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा 'जय हिंद, वंदे मातरम' एवढीच महत्त्वाची : संजय राऊत
अमरावती, परभणीतही व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा निषेध
परभणीत व्यंकय्या नायडू आणि केंद्र सरकार विरोधात शिवसेनेचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली. सोशल डिस्टनसिंग ठेवून शिवसेनेचं आंदोलन पार पडलं. आंदोलनात खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांनी उपस्थिती लावली. तसेच अमरावतीतही शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यंकय्या नायडू यांच्या पुतळ्याला चप्पल मारून घोषणाबाजी करत केला निषेध व्यक्त केला.
भिवंडीत शिवसैनिकांकडून व्यंकय्या नायडु यांचा जाहीर निषेध
भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राज्यसभा सदनात घेऊ नये हे माझे सदन आहे, असं वक्तव्य वापरून महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजपचे खासदार तथा उपराष्ट्रपती यांचा भिवंडी तालुक्यातील शिवसैनिकांनी जाहीर निषेध करीत नायडु यांच्या विरोधात घोषणाबाजी दिल्या यावेळी तालुका प्रमुख विश्वास थले, पंचायत समिती सभापती विकास भोईर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या :
'जय श्रीराम' लिहिलेली 10 लाख पत्र शरद पवारांना पाठवणार, भाजपा युवा मोर्चाकडून राज्यभर अभियान