एक्स्प्लोर
'प्रमोदजी, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय'
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतीदिनी देशभरातील राजकीय नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. ट्विटरवर आज प्रमोद महाजन ट्रेण्डिंगमध्ये आहेत.
मुंबई: भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतीदिनी देशभरातील राजकीय नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. ट्विटरवर आज प्रमोद महाजन ट्रेण्डिंगमध्ये आहेत.
लहान भाऊ प्रविण यांनी 22 एप्रिल 2006 रोजी प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. गंभीर जखमी झालेल्या प्रमोद महाजन यांनी 12 दिवस मृत्यूशी झुंज दिली होती. मात्र उपचारादरम्यान 3 मे 2006 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली होती.
याप्रकरणी प्रविण महाजन यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र पॅरोलवर सुटलेल्या प्रविण यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांचाही मृत्यू झाला होता.
'प्रमोदजी, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय'
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे दोन्ही भाजपचे नेते घनिष्ठ मित्र होते. गोपीनाथ मुंडेंची पत्नी ही प्रमोद महाजन यांची बहीण. त्यामुळे दोघे नातलगही होते.
प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर गोपीनाथ मुंडे एकटे पडले होते. मुंडे हे महाजनांबद्दलची आठवण जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवत होते.
गोपीनाथ मुंडे हे एकदा झी मराठीवरील 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळीही प्रमोद महाजनांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. यू ट्यूबवर 30 जानेवारी 2011 रोजी या कार्यक्रमाचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात आमंत्रित पाहुण्याने कोणालाही फोन लावायचा असतो. यावेळी गोपीनाथ मुंडेंनी चक्क स्वर्गीय प्रमोद महाजन यांना फोन लावला.
यावेळी "तुम्ही मला एकट्याला सोडून का गेला", असा सवाल मुंडेंनी प्रमोद महाजनांना फोनवरून विचारला. तसंच तुम्ही मैत्रीचा डाव अर्ध्यावर सोडून गेला. हा अन्याय आहे. तुम्ही परत या, असं मुंडे म्हणाले.
महाजनांच्या आठवणीने मुंडे यावेळी भारावून गेले. एक सख्खा मित्र गेल्याने मुंडे अजूनही दु:खी होते. त्यामुळे या कार्यक्रमातही मुंडे आपलं दु:ख लपवू शकले नाहीत..पाहा त्याच कार्यक्रमाचा हा व्हिडीओ
गोपीनाथ मुंडे फोनवरुन महाजनांना काय म्हणाले होते?
"प्रमोदजी मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, हो हो मी गोपीनाथ मुंडे बोलतोय मी.
आपण एकाचवेळी कॉलेजमध्ये होतो, एकाच खेळाच्या मैदानात खेळलो, एकाचवेळी आंबेजोगाईतून पुण्याला शिकायला गेलो, एकाचवेळी आणीबाणीत जेलमध्ये गेलो, एकाचवेळी आपण राजकारणात आलो, एकाचवेळी राजकारणात आपण यश संपादन केलं. मग याचवेळी आपण मला सोडून का गेलात एकटे? हा अन्याय आहे. तुमचं अचानक सोडून जाण्यामुळे माझं नाही, देशाचं नुकसान झालं आहे. कारण देशाला पंतप्रधानपदाचा उमेदवार नाहीय. तुम्ही असता,....परत या, तुम्ही आलात तर या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकाल, एवढी तुमची योग्यता आहे. असा तुम्ही एक डाव मांडला आणि हा डाव अर्ध्यावर का सोडला, हा माझा प्रश्न आहे. मित्र म्हणून तुम्हाला विचारण्याचा मला अधिकार आहे.
तुम्ही ममता, जयललिता, समता सगळ्यांना एकत्र बांधत होतात, आता कुणीच नाहीय आपल्याबरोबर..त्यांना तुम्हीच आणू शकला असता. शिवसेनेत - आमच्यातही कधी मतभेद होतात, पण युती कशी टिकवायची याची कला तुम्हाला अवगत होती, आम्हाला कुठंय? अशा स्थितीत तुमचं असणं किती आवश्यक होतं, आणि तुम्ही देश.....आज परत या...तुम्ही आलात तर या देशात नक्की क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि तुम्ही आलात तर माझ्यासारखे असंख्य लोक तुमच्या पाठिमागे उभे राहून ही क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही. पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे, कदाचित तुम्ही याच देशात जन्म घेतला असेल, आणि तोच प्रमोद महाजन या देशाला निश्चित महाशक्ती केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास वाटतो. तुम्ही बोललात, याबद्दल धन्यवाद".
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement