मराठा आरक्षणासाठी सरकार कुणबी नोंदीचा सांगत असलेला 54 लाखांचा आकडा फसवा : प्रकाश आंबेडकर
गरीब मराठ्यांचा नवीन वर्ग उभा करायचा आहे.त्यामूळे जरांगेंनी लोकसभेच्या रिंगणात उतरून भूमिका घ्यावी. 35 वर्षांपासून सुरू असलेल्या गरीब मराठ्यांच्या लढ्याला श्रीमंत मराठ्यांनी आकार, स्वरूप येवू दिलं नाही.
अकोला : मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) सरकार कुणबी नोंदीचा (Maratha Reservation ) सांगत असलेला 54 लाखांचा आकडा फसवा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होतेय. सरकारला दंगली भडकवायच्या असल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी केलाय. दरम्यान, मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil ) आगामी लोकसभा किंवा विधानसभा लढवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय.
समाजात दंगली पेटवण्याचा अजेंडा -
मनोज जरांगे यांच्यासारखं गरीब मराठ्यांचं नेतृत्व उभे राहलं. मनोज जरांगेंच्या नेतृत्वामुळे श्रीमंत मराठा हादरला आहे. त्यामुळे मनोज जरांगेंचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारवर दबाव आहे. सरकारकडून सांगण्यात येणारे आकडे फसवे आहेत. दोन समाजात दंगली पेटवण्याचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. ओबीसींना उचकवण्याचं सरकारचे प्रयत्न आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
मराठ्यांनी जरांगेंच्या मागे उभं राहावं -
मनोज जरांगेंच्या पाठीमागे गरीब मराठ्यांनी पूर्णपणे उभं राहावं. मुंबईतील आंदोलनात गरीब मराठ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. जरांगे पाटलांना झुरवण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुकींमुळे सरकारचा हात दगडाखाली असल्याचं जरांगेंनी लक्षात घ्यावं. जरांगेंनी येणाऱ्या लोकसभेत कुणाला पाठिंबा देण्याची भूमिका घेवू नये. जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी, असे प्रकाश आंबेकर म्हणाले.
जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे -
गरीब मराठ्यांचा नवीन वर्ग उभा करायचा आहे.त्यामूळे जरांगेंनी लोकसभेच्या रिंगणात उतरून भूमिका घ्यावी. 35 वर्षांपासून सुरू असलेल्या गरीब मराठ्यांच्या लढ्याला श्रीमंत मराठ्यांनी आकार, स्वरूप येवू दिलं नाही. जरांगेंच्या आंदोलनाच्या रुपाने त्याला एक स्वरूप आलं, आकार आला आणि एक महत्त्वाची मागणी समोर आली. ज्याला समाजात सहानूभुती आहे, प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण करायचं असल्यास जरांगेंनी आंदोलनाबरोबर राजकीय भूमिका घेतली पाहिजे. लोकसभेच्या संदर्भातील भूमिका जरांगेंनी घेतली पाहिजे.
गरीब मराठ्यांचा आवाज लोकसभेत जाण्यासाठी जरांगेंनी भूमिका घ्यावी. आंदोलन सुरू असतांना राजकीय भूमिकेवर जरांगे गांभीर्याने विचार करतील अशी अपेक्षा आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
मराठ्यांच्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा -
मुंबईतील गरीब मराठ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. गरिब मराठ्यांनी जरांगेंच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने उभं राहावं अन्यथा इथला श्रीमंत मराठा (निजामी) झुकणार नाही हे लक्षात घ्यावं, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
जरांगे पाटलांनी ताकद निर्माण केली आहे, त्यामुळे ते ताकदीच्या जोरावर संसदेत पोहचू शकतात याची आम्हाला खात्री आहे. संसदेत गेल्यानंतर तुमच्या प्रश्नांचा निकाल लावता येतो.निजामी मराठा हा सल्ला जरांगेंना देणार नाहीत.दोन तीन महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. तो कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गरीब मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, पुढील पाच वर्ष हे आंदोलन जिरवू शकतो अशी भूमिका निजामी मराठ्यांची आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
इंडिया आघाडीवर काय म्हणाले आंबेडकर ?
राज्यात सुरू असलेली ठेकेदारी पद्धत बंद व्हावी. मतांच्या ध्रुवीकरणाचा मी कधी विचार करत नाही, ज्या प्रश्नांसाठी लढतोय ते सोडवण्यासाठी संसदेत कसं पोहचायला हवे याकडे बघतो.इंडिया आघाडीतील बोलनी अद्याप पुढे सरकली नाहीत. वर्षभरापूर्वी जिथे होतो तिथेच थांबलेलं आहे. इंडिया आघाडीत जाण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहणार, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.