Dipali Chavan Suicide Case: दिपाली चव्हाणाच्या आत्महत्येच्या मुळाशी वाघ आणि सागवान तस्कर : प्रकाश आंबेडकर
आठवडाभरात सरकारने कारवाई न केल्यास पुरावे सार्वजनिक करण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा इशारा.अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगामुळे मुख्यमंत्री कार्यालय गैरव्यवहारात सहभागी आहे का? आंबेडकरांचा सरकारला सवाल.
अकोला : मेळघाटमधील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या मुळाशी मेळघाट आणि धारणी क्षेत्रातील वाघ आणि सागवान तस्कर असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते अकोला येथे शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. धारणी आणि मेळघाटमधील वाघ कमी होणे, वाघाची तस्करी, सागवानाची अवैध विक्री यातूनच दिपाली यांना या साखळीनं आत्महत्येला प्रवृत्त केल्याचं आंबेडकर म्हणालेत. यासंदर्भात आंबेडकरांनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात आठवडाभरात सरकारनं ठोस कारवाई न केल्यास पुरावे सार्वजनिक करण्याचा इशाराही यावेळी आंबेडकरांनी सरकारला दिला आहे.
मेळघाटात काम करणाऱ्या 'एन.जी.ओ.' आणि जमीन विक्रींची चौकशी करा : प्रकाश आंबेडकर
दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगानं आंबेडकर यांनी मेळघाटात काम करणाऱ्या 'एनजीओ' (गैरसरकारी सामाजिक संस्था) यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच गेल्या काळात कायद्याने बंदी असलेल्या आदिवासींच्या जमीन विक्रीच्या चौकशीचीही मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात नुकतंच निलंबन झालेल्या अमरावतीचे अप्पर प्रधान वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्ह्याला प्रोत्साहीत केल्याचा आरोप ठेवत नव्यानं गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी यावेळी आंबेडकर यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकार वाघांचं की लांडग्यांचं? : प्रकाश आंबेडकर
दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या मुळाशी वाघ तस्कर असल्याचं सांगताना आंबेडकर यांनी शिवसेनेलाही टोला लगावलाय. स्वत:ला वाघ समजणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता असलेल्या सरकारच्या काळातही वाघ तस्करांच्या कारवाया सुरूच असल्याने 'हे सरकार वाघांचं की लांडग्यांचं?', असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे.
मुंबई पोलिसांना दिलेल्या 100 कोटी वसुली 'टार्गेट'मागे कोण? : प्रकाश आंबेडकर
सध्या राज्यात राजकारण आणि प्रशासनातील गुन्हेगारी प्रवुत्तींची हातमिळवणी झाल्याचं आंबेडकर म्हणालेत. त्यामुळे सध्या वसुलीचं राज्य सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. 100 कोटींच्या वसुलीचा निर्णय कॅबिनेटचा होता की सरकारमधील तीन पक्षांचा?, असा सवालही त्यांनी यावेळी केला. भाजपही या भ्रष्टाचारात सहभागी आहे का? अमित शाहंचं सर्वच गोष्टी जाहीर करता येत नाही त्याचाच भाग आहे का? असा सवालही आंबेडकरांनी यावेळी भाजपला केला आहे.
अनिल देशमुखांच्या चौकशी आयोगाच्या निमित्ताने सरकारवर प्रश्नचिन्ह : प्रकाश आंबेडकर
अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाच्या गठणावरून आंबेडकरांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. देशमुखांच्या चौकशीसाठी नेमलेला आयोग नेमका कशासाठी?, याचा खुलासा सरकारनं करावा, अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे. चौकशी आयोग नेमल्यामूळे मुख्यमंत्री कार्यालय गैरव्यवहारात सहभागी होतं का?, असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.
आंबेडकरांनी दिल्यात शरद पवारांना 'शुभेच्छा'
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक. शरद पवारांवर पोटदुखीच्या आजारामुळे मुंबईच्या 'ब्रीच कँडी' रूग्णालयात आज शस्त्रक्रिया करण्यात आली. शरद पवार लवकर बरे व्हावेत, त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, अशा शुभेच्छा आंबेडकर यांनी यावेळी शरद पवारांना दिल्यात.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वीरप्पा मोटे वंचितचे उमेदवार :
या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केली. पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी वीरप्पा मधुकर मोटे हे वंचित बहूजन आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याची घोषणा यावेळी आंबेडकरांनी केली. धनगर समाजाचे वीरप्पा मोटे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक आंदोलनात ते सक्रीय असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे.