एक 'पॉझिटिव्ह' स्टोरी...एक मजूर, एक पत्रकार, एक 'हिरो', तीन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती अन् सोशल मीडिया...
ही बातमी आहे एक कोरोना पॉझिटिव्ह मजूर... एक कोरोना पॉझिटिव्ह पत्रकार आणि एक कोरोना पॉझिटिव्ह अभिनेत्यामधली... संकटाच्या या काळात तिघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले आणि गंभीर आजारी असलेल्या त्या गरीब मजुराला तब्बल सहा दिवस भटकल्यानंतर रुग्णालयात बेड मिळाला.
नागपूर : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असताना नागपुरात तीन पॉझिटिव्ह रुग्णांमधली एक पॉझिटिव्ह बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे एक कोरोना पॉझिटिव्ह मजूर... एक कोरोना पॉझिटिव्ह पत्रकार आणि एक कोरोना पॉझिटिव्ह अभिनेत्यामधली... संकटाच्या या काळात तिघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले आणि गंभीर आजारी असलेल्या त्या गरीब मजुराला तब्बल सहा दिवस भटकल्यानंतर रुग्णालयात बेड मिळाला. सहा दिवस भरकटल्यामुळे आता त्या मजुराचं संक्रमण वाढलं असून त्याचा रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष सुरु आहे.
पंचावन्न वर्षांचे भाऊराव टेम्भूर्णे. गेले अनेक दिवस ते कोरोना बाधित होते. हळूहळू त्यांची अवस्था ही खालावत होती. त्यांचा 20 वर्षीय मुलगा धनंजय त्यांना घेऊन गेले सहा दिवस विविध रुग्णालयांच्या चकरा मारत होता. मात्र, कुठे ही त्यांना बेड मिळत नव्हते. त्यामुळे निराश झालेल्या धनंजय याने त्याच्याकडे असलेल्या नागपूरचे पत्रकार प्रसन्ना जकातेच्या नंबरवर व्हॉट्सअॅप मेसेज करत बेडसाठी मदत मागितली. प्रसन्ना स्वतः कोरोना बाधित असल्याने रुग्णालयातील आयसीयूमध्ये होते. तिथूनच त्यांनी धनंजयला मदतीचे आश्वासन देणारे मेसेज करत हिंमत दिली. त्यानंतर प्रसन्नाने नागपुरातील, राज्यातील डझनभर नेत्यांना मेसेज केले, गरीब मजुरांसाठी बेडची मदत मागितली.
काहींनी हो करतो, पाहतो असे उत्तर दिले तर काहींनी प्रतिसाद ही दिला नाही. अखेरीस प्रसन्नाने सोनू सूद यांना ट्विट करत मदत मागितली. आणि अवघ्या काही मिनिटात सोनू सूदचा प्रतिसाद आला. "गरीब है तो क्या हुआ 15 मिनिट में बेड की व्यवस्था हो जायेगी"... सोनू सूदच्या या आश्वासक उत्तरानंतर अवघ्या काही मिनिटात सोनू सूदच्या कार्यालयाने प्रसन्ना आणि धनंजय यांना संपर्क साधले आणि संध्याकाळपर्यंत नागपूरच्या मेयो रुग्णालयात एक ऑक्सिजन बेडची व्यवस्था करून दिली.
गेल्या सहा दिवसांपासून एका बेडसाठी दिवस रात्र फिरणाऱ्या भाऊराव टेम्भूर्णे यांना बेड मिळाला आहे. मात्र अजूनही त्यांची प्रकृती स्थिर नाही. गेल्या सहा दिवसात त्यांचा एचआरसीटी स्कोर 22 होऊन फुफ्फुसामध्ये संक्रमण वाढलं आहे. त्यामुळे वडिलांना आणखी मदतीची गरज असून लवकर व्हेंटिलेटर बेड मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतील असे धनंजयचे म्हणणे आहे.
पहिल्या लॉकडाउनच्या वेळेलाही घरी परतणाऱ्या प्रवासी मजुरांना सोनू सूदने मोलाची मदत केली होती. तेव्हा त्याच्या मदतीमुळे राजकारणात वाद प्रतिवाद ही झाले होते. मात्र आता जेव्हा एका गरीब मजुराला मदत करायला राज्यातला एकही राजकारणी पुढे आला नाही, तेव्हा पुन्हा एकदा तोच सोनू सूद स्वतः कोरोना पॉझिटीव्ह असताना ही समोर आला आहे. त्याने आणि पत्रकार प्रसन्ना जकात यांनी दाखवलेली संवेदनशीलता सर्वांनी दाखवली तर मानवतेवर आलेलले हे संकट सहज पेलवणे शक्य होणार आहे.