Devendra Fadnvis: 'शरद पवार चाणक्य, राजकारणात काहीही शक्य...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याने भुवया उंचावल्या
Devendra Fadnvis on Sharad Pawar: शरद पवार यांनी आरएसएसचे कौतुक केले, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर भाष्य केलं आहे.
Devendra Fadnvis on Sharad Pawar: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे, शरद पवारांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विजयासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ला श्रेय देत त्यांच्या कामाचे, प्रचाराचे कौतुक केले. निवडणुकांचे कौतुक केले. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'शरद पवार हे चाणक्य आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने प्रचार केलेला फेक नेरेटिव्ह विधानसभा निवडणुकीत फसला हे त्यांच्या लक्षात आले असेल. ही शक्ती (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) नियमित राजकारण करणारी नसून राष्ट्र घडवणारी शक्ती आहे, हे शरद पवारांच्या लक्षात आले असेल. शेवटी, प्रतिस्पर्ध्याची स्तुती देखील केली पाहिजे. त्यामुळेच त्यांनी आरएसएसचे कौतुक केले असावे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष जवळ येण्याच्या किंवा पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मी तुम्हाला सांगतो 2019 नंतर तुम्ही माझी विधाने ऐकली असतील. 2019 ते 2024 या काळात घडलेल्या घटनांमुळे मला समजले आहे की राजकारणात काहीही अशक्य नाही. काहीही होणार नाही असे समजून पुढे जाऊ नये. कधीही काहीही होऊ शकते. उद्धव ठाकरे तिकडे जाऊ शकतात, अजित पवार इकडे येतात. राजकारणात काहीही होऊ शकते. असे होणार नाही, असे आपण ठामपणे सांगत असताना राजकीय परिस्थिती आपल्याला कुठे घेऊन जाईल, याची शाश्वती नसते, हे लक्षात घेतले पाहिजे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
नागपुरातील देवेंद्र फडणवीसांची मुलाखत चांगलीच चर्चेत
नागपुरातील काल (शुक्रवारी 10 जानेवारी) संध्याकाळी जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध राजकीय प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिलं. यावेळी त्यांना राज ठाकरे की उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे की अजित पवार? नरेंद्र मोदी की अमित शाह यांच्यापैकी एका नेत्याची निवड करण्यास सांगितलं गेलं, त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रभावी उत्तरांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरे की उद्धव ठाकरे?
मुलाखतीमध्ये रॅपीड फायर घेण्यात आलं यावेळी देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असा प्रश्न केला. त्यावर फडणवीस म्हणाले, 'राजकारणात काहीही पक्कं नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते. मग राज ठाकरे मित्र झाले. आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे हे काही शत्रू नाहीत.'
एकनाथ शिंदे की अजित पवार कोण अधिक विश्वासू सहकारी?
फडणवीसांना खूप मनापासून विश्वास टाकावा असा सहकारी कोण? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर एकनाथ शिंदे की अजित पवार? यावर फडणवीस म्हणाले, तुम्ही माझ्यापुरतं विचाराल तर या दोन्ही नेत्यांशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्या दोघांचे वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळे डायनॅमिक्स असू शकतात. एकनाथ शिंदे आणि माझी जुनी मैत्री आहे. परंतु, अजित पवार यांच्याकडे जी राजकीय परिपक्वता आहे, त्यामुळे त्यांची आणि माझी व्हेवलेंथ जुळते.