Nagpur Police Recruitment : कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी भरता येईल अर्ज, उमेदवारांमध्ये असंतोष
Nagpur Police Recruitment : एका जिल्ह्यात संधी हुकली तर ज्या जिल्ह्यात जास्त जागा असतील, त्या जिल्ह्यात अर्ज भरता येत होता. परंतु, आता पोर्टलवर एकच अर्ज केल्यानंतर दुसरा अर्ज भरता येत नाही. असा अर्ज बाद ठरविला जाणार आहे.
Nagpur News : पोलीस भरतीचे स्वप्न बाळगून अनेक वर्षे मैदानात घाम गाळून तसेच वाचनालयात मेहनत करुन भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या अटीने निराश केले आहे. या भरतीत उमेदवार कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करु शकतील, या अटीमुळे दिवसरात्र पोलीस होण्यासाठी (Police Recruitment) तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये असंतोष पसरला आहे. ही अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी उमेदवारांनाकडून होत आहे.
राज्यभरात पोलीस शिपाईच्या 18 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्वाधिक सात हजार जागा मुंबई आयुक्तालया अंतर्गत आहेत. यामध्ये एका जिल्ह्यात शहर, ग्रामीण आणि लोहमार्ग पोलीस अशा गटांत भरती होत आहे. मात्र, कोणत्याही एका गटात एकच अर्ज भरता येण्याची अट यामध्ये असल्याने यामुळे पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांवर अन्याय होणार आहे.
गृहविभागाने (Ministry of Home Affairs) ही अट रद्द करावी, अशी मागणी केली जात आहे. उमेदवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन निवेदन दिले. राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत त्वरित शुद्धीपत्रक काढून ही अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी केली.
Nagpur Police Recruitment : पोर्टलवर फक्त एकच अर्ज भरता येणार
तीन वर्षांआधीपर्यंत म्हणजेच 2019 पर्यंत उमेदवारांना कोणत्याही जिल्ह्यातील भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी होती. त्यामुळे एका जिल्ह्यात संधी हुकली तर दुसऱ्या जिल्ह्यात सहभागी होण्याची शक्यता होती. ज्या जिल्ह्यात जास्त जागा असतील, त्या जिल्ह्यात अर्ज भरता येत होता. परंतु, आता पोर्टलवर एकच अर्ज केल्यानंतर दुसरा अर्ज भरता येत नाही. असा अर्ज भरला तर बाद ठरवला जाणार आहे.
Nagpur Police Recruitment : संधी हुकली तर अनेक वर्षांची प्रतिक्षा!
गेल्या अडीच वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या चेतन याने सांगितले की, शारीरिक चाचणीत कोणत्याही कारणाने बाद होण्याची शक्यता असते. कधी गोळाफेक (Throw Ball) चुकतो तर कधी रनिंगमध्ये (Running) एका पॉईंटने संधी गमावू शकतो. अशावेळी पुन्हा तयारी करुन दुसऱ्या जिल्ह्यासाठी प्रयत्नात यशस्वी होण्याची संधी असते. मात्र, आता ती मिळणार नाही. त्यासाठी दुसऱ्या भरतीसाठी पुन्हा अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. अशावेळी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पोलीस भरतीमध्ये विविध चाचण्यांच्या गुणांच्या आधारावर निवड होते. एखाद्या चाचणीत कमी गुण मिळाले तर उमेदवाराला दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज भरण्याची संधी होती. मात्र राज्य सरकारच्या या नव्या अटीनुसार एकच अर्ज भरता येईल. तसेच यात संधी हुकली तर विद्यार्थ्याला दुसऱ्या भरतीची वाट बघावी लागणार आहे. सरकारकडून भरतीही नियमित नसल्याने या काळात अनेक उमेदवार वयाची मर्यादा ओलांडतील तर त्यांचे आयुष्याचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने ही जाचक अट रद्द करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनीही केली आहे.