Navy Day : नौसेना दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबरला सिंधुदुर्ग किल्ल्यावर, शिवरायांच्या पुतळ्याचंही अनावरण होणार
Sindhudurg Fort:
मुंबई: यंदाचा नौसेना दिन महाराष्ट्रासाठी आणि शिवप्रेमींसाठी खास असणार आहे. या वर्षीचा नौसेना दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. त्याचवेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.
भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवछत्रपतींना ओळखलं जातं. आरमारावर ज्याचं राज्य त्याचं जगावर राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम ओळखलं होतं आणि त्या दृष्टीने आरमार उभं केलं. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग आणि इतरही अनेक समुद्री किल्ल्यांची निर्मिती केली होती. याच शिवरायांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी यंदाचा नौसेना दिन हा सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती असणार आहे.
यंदाचा जलपर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर भारतीय नौसेना दिनाच्या तयारीला प्रचंड वेग येणार आहे. एवढा मोठा राष्ट्रीय कार्यक्रम किल्ल्यात होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जात आहे. या सोहळ्याच्या प्राथमिक तयारीचा माग म्हणून 18 मे रोजी स्टर्न नेक कमान प्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ दिनेश त्रिपाठी यानी सिंधुदुर्ग किल्ला परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी सिंधुदुर्ग किल्याचे सर्वेक्षण केले गेले होते. 3 आणि 4 डिसेंबर असे दोन दिवस सोहळा रंगत असणार मात्र मुख्य कार्यक्रम ४ डिसेंबरला होईल.
सन 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जो वज्राघात केला होता, त्यामुळे पाकिस्तानला सपशेल शरणागती पत्करावी लागली होती. या वज्राघाताने भारतीय नौसेनेची खरी ताकद साऱ्या जगाला कळून चुकली आणि त्यामुळेच दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौसेना विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
ब्रिटिश व्यापाऱ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सागरी किल्ल्यांची गरज असल्याचं शिवरायांनी जाणलं आणि अनेक जलदुर्गांची निर्मिती केली. त्यामध्ये सिंधुदुर्ग हा किल्ल्याचा सर्वात वरचा क्रमांक लागतोय. डोंगरी किल्यांच्या बरोबरीने अरबी समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जलदुर्गांचे महत्त्व आहे हे सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी ओळखलं. त्यानंतर शिवरायांनी सागरी किल्ल्यांची निर्मिती सुरू केली.
स्वराज्यातील एक महत्त्वाचा सागरी किल्ला असलेला सिंधुदुर्ग हा त्यापैकीच एक. या किल्ल्याच्या निर्मितीसाठी शिवरायांनी मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट निवडले. 25 नोव्हेंबर 1664 रोजी शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली. शिवरायांच्या हस्ते ही पायाभरणी करण्यात आली. या किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 500 खंडी शिशाचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष देत गेली साडेतीनशे वर्षे ऐतिहासिक सिधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रात डौलाने उभा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यात महाराजांचे एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे. सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी त्याकाळी एक कोटी होन खर्ची पडल्याचं म्हटलं जातंय. या किल्ल्याच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला किल्ला अशी ओळख असलेला सिंधुदुर्ग जवळपास साडेतीनशे वर्षे समुद्राच्या लाटा झेलत उभा आहे. या किल्ल्याचे क्षेत्र सुमारे 48 एकर आहे आणि त्यांचा तट दोन मैल इतका आहे. या तटाची उंची 30 फूट तर रूंदी 12 फूट आहे. या किल्ल्याच्या तटास ठिकठिकाणी भक्कम असे 22 बुरुज आहेत. सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटलेले आहेत. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. 1695 साली शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे.