एक्स्प्लोर
शेंगदाणे विक्रेत्याच्या पत्राची पंतप्रधानांकडून दखल, पत्नीच्या कॅन्सर उपचारासाठी मदत
धुळे : दिवसभर लोटगाडीवर शेंगदाणे, फुटाणे विकून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या धुळे जिल्ह्यातील साक्री मधील कैलास मोरे याच्या पत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. कैलासच्या पत्नीच्या पोटाच्या कॅन्सरवरील उपचारासाठी 1 लाख 75 हजार रुपयांची मदत दिली. आर्थिक परिस्थिती खालावलेली असतांना पत्नीच्या उपचारासाठी पैशाची जमवाजमव कशी करावी, या विवंचनेत असलेल्या कैलासच्या मदतीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धावून आले.
कॅन्सरवरील उपचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमएनआरफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीच्या माध्यमातून पावणेदोन लाखाची तातडीची मदत दिली. पत्र कैलासला तसेच मुंबई येथील टाटा मेमोरिअरल हॉस्पिटलला प्राप्त झालं आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पंतप्रधान मदतीच्या रूपानं धावून आल्यानं कैलासची पत्नी सिंधूबाई हिच्यावरील कॅन्सर उपचारासाठी होणाऱ्या खर्चाला मोठा आधार मिळाल्यानं या मोरे दाम्पत्यानं पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
साक्री मधील भोई गल्लीत राहणारा कैलास मोरे याच चार जणांचे सुखी कुटुंब. त्या कुटुंबाचा गाडा रेटण्यासाठी तो दिवसभर लोटगाडीवर शेंगदाणे, फुटाणे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला मनीषा आणि लोकेश ही दोन मुले आहेत. पत्नी सिंधूबाई ही मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी पती कैलासला संसाराचा गाडा हाकण्यासाठी मदत करतेय. गेल्या महिन्यांपूर्वी सिंधूची प्रकृती बिघडली. तिची तपासणी केली असता तिला कॅन्सर असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं . कॅन्सरवर उपचार करणे महागडे असल्याने समाजबांधवांनी व काही दानशूर लोकांनी या मोरे दाम्पत्याला मदत केली. मात्र कॅन्सर उपचारासाठी सहा लाख रुपये खर्च येणार होता.
जमलेल्या पैशात मुंबई येथे टाटा हॉस्पिटलमध्ये सिंधूवर उपचार सुरू आहेत. दर महिन्याला मुंबईत उपचारासाठी जाण्यासाठी लागणार खर्च हा या मोरे कुटुंबाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला. पैशांची चणचण असल्याने कैलासने सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले व मदतीचे आवाहन केले.
पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहीचे एक पत्र कैलास मोरेला पाठवले. या पत्रात पत्नी सिंधूच्या कॅन्सर उपचारासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीच्या माध्यमातून 1 लाख 75 हजार रुपये मंजूर केले. ही रक्कम टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे वर्ग करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी असलेल्या या पत्रात कैलासच्या पत्नीची प्रकृती बरी होईल, अशी शुभेच्छा देखील पंतप्रधान मोदींनी दिली आहे. पंतप्रधानांची ही शुभेच्छा कॅन्सरशी लढणाऱ्या सिंधू मोरेला अधिक बळ देणारी ठरेल, एवढं निश्चित.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement