एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोल्हापूर महापालिकेची भन्नाट आयडिया, स्वीगी, झोमॅटोला 'असा' दणका
या कारवाईचं तर सर्वत्र स्वागत होईलच मात्र ज्या ठिकाणाहून प्लास्टिक बाजारात आणले जाते, त्यांच्यावर देखील कारवाई करणं गरजेचं आहे. नाही तर केवळ सामान्य नागरिकांच्या डोक्यावर कारवाई तलवार नको, असं नागरिकांचं मत आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात प्लास्टिक मुक्तीसाठी जोरदार प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. आजच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्विगी आणि झोमॅटो या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनींना दंड केला आहे. या दोन्ही कंपनींना कोल्हापूर महापालिकेनं प्रत्येक पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. तर ज्या हॉटेलमधून हे पार्सल आणले जात होते त्या हॉटेलला देखील पालिकेनं दंड केला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे या संदर्भात अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या.
आज पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच या दोन्ही कंपनींकडून खाद्य पार्सल मागवले. त्यावेळी या अधिकाऱ्यांना प्लास्टिकच्या बॅगमधून खाद्यपदार्थ देण्यात आले. हॉटेलमधून पार्सल मागवणे हा डाव पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रचलेला होता. त्यामध्ये या दोन्ही कंपनींचे कर्मचारी अडकले. त्यामुळं इथून पुढे कोल्हापुरात प्लास्टिक वापरणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, हा संदेश या कारवाईतून दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली होती.
या सभेत आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना आवाहन केलं होतं की कोल्हापूर शहर हे सुंदर ठेवण्यासाठी सगळ्यांनी पुढं येणं गरजेचं आहे. आपल्या प्रभागामध्ये नागरिकांत जनजागृती करा आणि प्लास्टिक वापण्यापासून परावृत्त करा असं आवाहन करण्यात आलं होतं. यावेळी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सभागृहात प्लास्टिकचे दुष्परिणाम यावर सादरीकरण केलं होतं.
कोल्हापूर शहर हे प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण कोल्हापूर शहर प्लास्टिकमुक्त व्हावे यासाठी कोल्हापूर महापालिकेचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळं ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं प्लास्टिकचा वापर कोणी करत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचं धोरण पालिकेनं हाती घेतलं आहे.
त्यामुळं आपलं शहर आपणच स्वच्छ आणि निरोगी ठेवून अशी जी पालिकेनं साद घातली आहे त्याला नागरिकांनी प्रतिसाद देणं गरजेचं आहे. तरच लवकरात लवकर कोल्हापूर शहर हे प्लास्टिकमुक्त होईल, असं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. जर प्लास्टिक ज्या ठिकाणाहून पुरवलं जातं त्याच ठिकाणी कारवाई केली तर ते मार्केटमध्ये येणारच नाही आणि नागरिकांना देखील कापडी पिशवी वापरण्याची सवय लागेल, असंही काही सुज्ञ नागरिकांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement