(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhalchandra Nemade: औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे लोक क्षुद्र : ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची टीका
Bhalchandra Nemade: औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करणारे क्षुद्र लोक असून अशा नामांतराने काही साध्य होणार नसल्याचे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले.
Bhalchandra Nemade: औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे क्षुद्र लोक आहेत. त्यातून काही साध्य होणार नाही, असे रोखठोक मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी व्यक्त केले. औरंगाबादला पाणी द्या , तिथे चांगली झाडे लावा लावा असेही त्यांनी सुनावले. हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती जशी नष्ट झाली तशी आपल्या संस्कृतीच्या अंताची सुरुवात झाली असल्याची भीती नेमाडे यांनी व्यक्त केली. भारतात लोकशाही धोक्यात आली असून सत्य बोलणाऱ्याला पोलीस संरक्षणात फिरावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले.
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची सयाजी शिंदे (Sayaji Shinde) आणि त्यांच्या सह्याद्री देवराई (Sahyadri Devarai) संस्थेमार्फत देशी बियाणांच्या माध्यमातून बीजतुला करण्यात आली. या वेगवगेळ्या प्रकारच्या देशी बियाणांची रोपं तयार करून त्यांची राज्यातील वेगवगळ्या भागात लागवड करण्यात येणार आहे. यानिमित्ताने भालचंद्र नेमाडे यांना 'एबीपी माझा'ने अनेक विषयांवर बोलतं केलं. भालचंद्र नेमाडे यांनी देखील 'हिंदू'च्या पुढच्या भागात काय असेल, खंडेरावचा प्रवास कसा असेल इथपासून ते देशीवादाची आजची अवस्था, प्रमाण मराठी भाषा कशाला म्हणायचं, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे नक्की काय होतंय, शहरांच्या नावे बदलल्याने नक्की काय साध्य होतंय ते आज भारतात लोकशाही धोक्यात आलीय का इथपर्यंत वेवेगळ्या विषयांवर सडेतोड मते मांडली.
देशीवाद धोक्यात
भालचंद्र नेमाडे यांनी मुलाखतीत म्हटले की, देशीवाद हा जगभरात स्वीकारला गेला आहे. 'एन्सायक्लोपीडिया'मध्ये देशीवाद हा शब्द आणि संकल्पना स्वीकारण्यात आली आहे. ज्या मातीतून आपण उगवलो त्या मातीशी कृतज्ञ राहणं म्हणजे देशीवाद आहे, असे नेमाडे यांनी म्हटले. हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती जशी नष्ट झाली तशी आपल्या संस्कृतीच्या अंताची सुरुवात झाली आहे. झापडबंद पद्धतीने बदल स्वीकारले गेल्यानं हे झालं असल्याची टीका त्यांनी केली. जगभरात उजव्या विचारसरणी वाढीस लागल्याने देशीवाद धोक्यात आला आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भारतातील कम्युनिस्टांनी जात वास्तव नाकारले. त्याच्या परिणामी ते संपले असल्याची टीका नेमाडे यांनी केली.
शहरांची नावे बदलून काय होणार?
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावं बदलणारे क्षुद्र लोक आहेत. त्यातून काही साध्य होणार नाही, अशी कठोर टीकाही नेमाडे यांनी केली. औरंगाबादला पाणी द्या, तिथे चांगली झाडे लावा असेही त्यांनी म्हटले.
भारतात लोकशाही धोक्यात
भारतात लोकशाही खरंच धोक्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले. खरं बोलणाऱ्याला पोलीस संरक्षणात फिरावं लागत आहे. मला धमकीचे पत्र आल्याने मला त्रास झाला.
प्रमाण मराठी भाषा असं काही नाही
प्रमाण मराठी भाषा असं काही नाही. प्रत्येकाची भाषा तेवढीच प्रमाण आणि शुद्ध आहे असेही त्यांनी स्पष्ट म्हटले. इंग्रजांनी मराठी भाषेचा कोष करण्याचे काम चित्पावन ब्राम्हणांना दिले होते. त्यामुळेच ती प्रमाण भाषा पुण्यात मानली गेली. परंतु प्रत्येकाची भाषा तेवढीच प्रमाण आहे, असेही त्यांनी म्हटले. इंग्रजी शाळांमधून शिकणारी मुलं पुढं काही बनू शकत नाहीत. त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
राष्ट्र आणि धर्म संकल्पना नष्ट व्हाव्यात
राष्ट्र आणि धर्म या संकल्पना नष्ट झाल्या पाहिजेत असे कठोर मतही त्यांनी व्यक्त केले. नेमाडे यांनी व्यक्त केलेल्या मतांवरून वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या या वक्तव्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
'हिंदू'च्या पुढील भागात काय होणार?
भालचंद्र नेमाडे यांनी मुलाखतीत 'हिंदू' कादंबरीच्या आगामी कथानकाबाबतही भाष्य केले. 'हिंदू'च्या पुढल्या भागात खंडेराव हा पुरातत्व खात्यात नोकरी सुरु करतो. पुरातत्व संशोधन करत तो तक्षशीलेला पोहचतो. तेव्हा त्याला ग्रीस आणि युरोपातून इथे लोक शिक्षणासाठी येत असल्याचं जाणवतं, असे कादंबरीत असणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भालचंद्र नेमाडे यांच्या 'हिंदू..जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीची मोठी चर्चा झाली होती. साहित्य विश्वात या कादंबरीची मोठी चर्चा झाली होती.