(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोणत्याही विमानतळावर दारु विकायची असल्यास परवानगी घ्यावीच लागेल, राज्य सरकारची कोर्टात माहिती
Duty Free shops at Mumbai airport : राज्य सरकारचे नियम लागू होत नसल्याचा मुंबई विमानतळावरील दुकानदाराचा दावा, विमानतळावरील ड्युटी फ्री वाईन शॉपलाही राज्य सरकारचे नियम लागू
मुंबई : राज्यातील कुठल्याही विमानतळावर दारु विकायची असल्यास आमची परवानगी घ्यावीच लागेल, विमानतळावरील ड्युटी फ्री वाईन शॉपलाही राज्य सरकारचे नियम लागू असतील, अशी माहिती राज्य शासनानं सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. (Duty Free shops at Mumbai airport) विमानतळावरील दारुचं दुकान 24 तास चालवण्याची मुभा आहे. मात्र विमानतळ हे महाराष्ट्रात आहे, त्यामुळे राज्यातील नियम विमानतळावरील दुकानदारांनाही लागू होतात. राज्य शासनाच्या नियमानुसार दुकानांच्या वेळा नियमित केल्या जातात. त्यांना विशेष सवलत दिली जाऊ शकते. पण विमानतळावरील दुकानांना महाराष्ट्राचे नियमच लागू होणार नाहीत, असा दावा केला जाऊ शकत नाही. असं राज्य सरकारची भूमिका व्यक्त करता महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी हायकोर्टाला सांगितलं.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती जीतेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत राज्यात अल्पवयीन मुलांना दारू विकण्यास मनाई आहे. जर तुम्हाला केवळ कस्टमचेच नियम लागू होतात, मग अल्पवयीन मुलांना तुम्ही दारु विकता का?, असा सवालही हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना करत उद्यापर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेमकी काय आहे याचिका ?
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीएफएस नावाचं दुकान आहे. रात्री 12 नंतरही सुरू असलेल्या मद्यविक्रीवरून या दुकानाला राज्य उत्पादन शुल्क विभागानं साल 2017 मध्ये कारणे द्या नोटीस बजावली होती. याशिवाय विविध नियमांचमही उल्लंघन झालेलं आहे, असा आरोप नोटीसमधून करण्यात आला होता. त्यानंतर दुकानाविरोधात पुढील कारवाई होण्यापूर्वी दुकानदारानं त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
मात्र हे दुकान ड्यूटी फ्री आहे, आम्हाला कस्टमचे नियम लागू होतात. राज्य सरकारचे नियम आम्हाला लागू होत नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागानं बजावलेली नोटीस व पुढील कारवाई रद्द करावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. परदेशात जाणाऱ्या नागरिकांना आम्ही दारु विकतो. परदेशातून येणाऱ्यांना आम्ही दारु विकत नाही. आमचं दुकान रात्री बंद ठेवलं तरी प्रवासी अन्य विमानतळावरुन दारू विकत घेऊच शकतात, असा युक्तिवाद दुकानदाराकडून करण्यात आला. या याचिकेवर मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.