मोठी बातमी! शीतल तेजवानीला जामीन नाहीच, आणखी 8 दिवस पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात काय म्हटलं?
मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्या कारणांसाठी पोलिसांनी शीतल तेजवानीची पोलीस कोठडी हवी आहे, याबाबतची माहिती पाहुयात.
Parth Pawar Land Scam Pune Sheetal Tejwani News : मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी (Land Scam Pune) आरोपी शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani) पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. आरोपी शितल तेजवानीला पुणे कोर्टाकडून आठ दिवस म्हणजे 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नेमकी कोणत्या कारणांसाठी पोलिसांनी शीतल तेजवानीची पोलीस कोठडी हवी आहे, याबाबतची माहिती पाहुयात.
1. सदर महिला आरोपी हिने शासनाचे मालकीची व ताब्यातील 40 एकर जमीन स्वतःचे फायदयाकरीता विक्री केलेली असून सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने त्याचा तपास करणे आहे.
2. सदर महिला आरोपी हिने सदरची जमीन ही शासनाची असताना ती महार वतन दाखवून बेकायदेशिर रित्या जमीन हस्तगत करण्याकरीता तिची विक्री केलेली असून सदर सर्व गुन्हेगारी कटामध्ये आणखी कोण कोण सामिल आहे? याबाबत तिच्याकडे विचारपूस करून तपास करणे आहे.
3. सदर महिला आरोपी हिने मुळ वतनदार यांचेकडून घेतलेले मुळ पॉवर ऑफ अॅटॉर्नी, मुळ विकसन करारनामे व इतर वेगवेगळे दस्त तिच्याकडून हस्तगत करणे आहे.
4. 272 मुळ वतनदार यांचे वारस यांना केलेले खरेदी विक्री दस्तामध्ये पैशाची देवाण घेवाण झालेली नसल्याचे दिसत असून त्याबाबत महिला आरोपी हिच्याकडे तपास करणे आहे.
5. सदर प्रकरणी आरोपी महिला यांनी कोणा कोणासोबत पैशाचे व्यवहार केलेले आहे याची सखोल चौकशी करणे आहे.
6. सदर महिला आरोपी हिने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचे कार्यालयास दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी केलेले पत्रव्यवहाराचे मुळ कागदपत्र तिच्याकडून हस्तगत करणे आहे.
7. सदर महिला आरोपी हिने शासनाची जमीन 300 कोटी रुपयांना विक्री केलेली असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता तिने सदर गुन्हेगारी कृत्य करणे करीता डिजीटल डिव्हाईल, लॅपटॉप इ. वापरला असल्याची शक्यता असल्याने गुन्हयाचे तपासकामी तिने वापरलेले डिजीटल डिव्हाईस, लॅपटॉप इ. तिच्याकडून जप्त करणे आहे.
8. सदर गुन्हयाची व्याप्ती मोठी असून सदर गुन्हा करताना तिच्या सोबत इतर आणखी लोकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत सहभागी असणारे इतर लोकांची नावे तिच्याकडून हस्तगत करून पुढील तपास करणे आहे.
9. सदर महिला आरोपी हिने केलेले खरेदी विक्री दस्तामध्ये जमिनीची रेडीरेकनर किंमत 300 कोटी रुपये असल्याचे नमूद केलेले आहे. परंतु, वास्तविक रित्या सध्याचे बाजार भावानुसार सदर जमिनीची किंमत रेडीरेकनर दराचे 4 ते 5 पट जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिने आरोपी कडून रेडीरेकनर दराचे व्यतिरीक्त काही रक्कम घेतली आहे किंवा कसे? याबाबत तिच्याकडे सविस्तर तपास करून पुरावा गोळा करणे आहे.
10. सदर महिला आरोपी हिने दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे एक पत्र व त्यासोबत 11000 रुपयांचा डी डी जमा केला होता, सदर डी डी जमा करून तिने दिशाभूल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असून सदर डी डी हा तिने कोणाचे आदेशावरून जमा केला होता, सदर डी डी ची रक्कम ही 11000 रुपये इतकीच का भरली? सदर डी डी भरणे करीता तिने कोणा कडून माहिती घेतली, इतर कोणी तिचे सोबत सहभागी आहे किंवा कसे? याबाबत तिच्याकडे सखोल तपास करणे आहे.
11. सदर महिला आरोपी हिने वर नमूद शासनाचे मालकीची जमीन ही ३०० कोटी रुपयांना खरेदी दस्तानुसार विक्री केलेली आहे. सदर ची रक्कम तिने घेतली आहे का? कोणत्या प्रकारे घेतली आहे? याबाबत तिस विचारपूस करून तपास करणे आहे.
12. सदर महिला आरोपी हिने सन 2020 ते 2021 दरम्यान सुध्दा कोणताही आदेश नसताना मा. जिल्हाधिकारी, पुणे यांचे कार्यालयास पत्रक देऊन सदर शेतजमीन परत मिळणे करीता सदर जमीनीचा कब्जा हक्क सारा रक्कम किती आहे? ती भरून घ्यावी, असे पत्रक दिलेले आहेत. शासनाचा कोणताही आदेश नसताना ती असे पत्रक देवू शकत नाही. तिने वारंवार असे पत्रक देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला असून सदर आरोपी महिलेस त्याबाबत विचारपूस करून तपास करणे आहे.
13. सदर गुन्हा करण्याच्या कटामध्ये सदर महिला आरोपी हिचे सोबत कोण कोण सामिल आहे, याबाबत तिच्याकडे तपास करणे आहे.
तरी वर नमूद मुद्दयांवर तसेच शासनाचे मालकीचे 40 एकर जमिनीची परस्पर विक्री करून शासनाची फसवणूक केली असल्याने गुन्हयाचे गांभीर्य पाहता सदर महिला आरोपीकडे सखोल तपास करणे असल्याने गुन्हयाचे तपासकामी तिची 14 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मिळण्यास विनंती आहे.
महत्वाच्या बातम्या:
Land Scam Pune Who Is Sheetal Tejwani: पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहारातील मोठा मासा; पोलिसांकडून अटक, जमीन विकणारी शीतल तेजवानी कोण?
























