10 लाख नको, माझ्या मुलाला काहीही आजार नव्हता, सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने मुख्यमंत्र्यांचा दावा 5 मिनिटांत खोडला!
सोमनाथ सूर्यवंशी हा दुर्धर आजाराने ग्रस्त होता, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यानंतर मात्र सूर्यवंशी या तरुणाच्या आईने फडणवीसांचे मत फेटाळून लावले आहे.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतील संविधानाच्या शिल्पाची विटंबना, त्यानंतर उफळलेला हिंसाचार आणि तोडफोडीवर सविस्तर माहिती दिली आहे. विधिमंडळात त्यांनी ही माहिती दिलेली आहे. सोबतच त्यांनी पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. सोबतच सूर्यवंशी हा तरुणाला अगोदरच आजार होता, असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यानंतर अवघ्या दहाच मिनिटांत सोमनात सूर्यवंशी यांच्या आईन फडणवीसांचा दावा खोडून काढला आहे. माझा मुलगा आजारी नव्हता. मला तुमचे दहा लाख रुपये नको आहेत, अशी भूमिका सोमनात सूर्यवंशी यांच्या आईने घेतली आहे.
माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता
माझा मुलगा चार दिवस त्यांच्या ताब्यात होता. मला तेव्हा का बोलवलं नाही. माझा मुलगा आजारी होता, असं त्यांना समजलं असेल तर त्यांनी मग आम्हाला का बोलावलं नाही. ते म्हणत आहेत की माझ्या मुलाला आजार होता. पण माझ्या मुलाला तंबाखू, सुपारीचं व्यसन नव्हतं. माझ्या मुलाला आजार नव्हतं. माझा मुलगा खूप व्यवस्थित होता. माझ्या मुलाचा मृत्यू होईपर्यंत मला का बोलावलं नाही. माझ्या मुलाच्या अंगावर जखमा होत्या, असं रिपोर्टमध्ये का आलं. माझ्या मुलाला कसलाही आजार नव्हता, असे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने सांगितले आहे.
सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा दुर्धर आजार- फडणवीस
परभणीत जी जाळपोळ सुरु होती, त्या व्हिडीओत सूर्यवंशी दिसत असल्याने त्यांना अटक करण्यात आली. सूर्यवंशी यांना दोनवेळा मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. त्यांच्या ऑर्डरची कॉपी माझ्याकडे आहे. दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना विचारले की, पोलिसांनी तुम्हाला थर्ड डिगरी मारहाण केली का, तुम्हाला मारहाण झाली का? सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत असतानाचे फुटेजही उपलब्ध आहे. त्यांना कुठेही मारहाण झाल्याचे दिसत नाही. पोस्टमार्टेम अहवालाचे पहिले पान सगळ्यांनी वाचले असेल. पण सूर्यवंशीच्या वैद्यकीय तपासणीत लिहले आहे की, त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता. वैद्यकीय अहवालात त्यांच्या जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. त्यांच्या एका खांद्याजवळचे हाडही तुटले आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी असताना सकाळी छातीत जळजळ सुरु झाली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, त्यांना तिकडे मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीसांनी नेमकी काय माहिती दिली?
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर अनेक शंका तयार झाल्या आहेत. ते आरोपी असले तरी गरीब होते आणि वडार समाजाचे होते. पैशांनी जीव परत येत नाही. पण राज्य सरकार सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करेल. या प्रकरणात उपस्थित झालेल्या शंकांचे निरसन झाले पाहिजे. या सगळ्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Somnath Suryawanshi Video News :
हेही वाचा :