Ashadhi Ekadashi : ना ठाकरे...ना फडणवीस, यंदा विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान एकनाथ शिंदेंना
Ashadhi Wari : यंदाच्या पंढरपूरच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का? की फडणवीस जाणार अशा चर्चा सुरू होत्या. अखेर फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला
![Ashadhi Ekadashi : ना ठाकरे...ना फडणवीस, यंदा विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान एकनाथ शिंदेंना pandharpur wari Eknath Shinde will do pandharpur pooja Ashadhi Ekadashi Ashadhi Ekadashi : ना ठाकरे...ना फडणवीस, यंदा विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान एकनाथ शिंदेंना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/30/79c549fd1cb7f68ff15af40abb3af37c_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pandharpur Wari : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा उलटफेर आज राजभवनात पाहायला मिळालय.. शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अनपेक्षित निर्णयाची घोषणा केली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. या घोषणेबरोबरच देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावरील यंदा आषाढीची पूजा कोण करणार हा संभ्रम देखील दूर केला आहे .
अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून असलेला आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वरांसह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहचेल. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे. विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांकडे आहे. आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय पूजेचा मान हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी पूजा केली होती. राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे शासकीय महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदेना मिळणार आहे.
राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे यंदाच्या पंढरपूरच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार का? की फडणवीस जाणार या चर्चांना ऊत आला होता. सोशल मीडियावर अनेक मिम्स देखील व्हायरल झाले. फडणवीसांच्या घोषणेनंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
पांडुरंगाच्या मनात जो, त्याच्याच हस्ते यंदाच्या एकादशीची पूजा होणार; सुनेत्रा पवार
पांडुरंगाच्या मनात जो असेल, त्याचाच हस्ते आषाढी एकादशीची पूजा होईल. सर्वांना सुखी ठेव, पाऊस पडू दे आणि राज्यावरचं संकट दूर होऊ दे असं साकडं त्यांनी पांडुरंगाला घातलं आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दिली होती.
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडखोरीनंतर राज्य सरकार जाणार हे स्पष्ट होते. त्यामुळे यंदाची एकादशीची पूजा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार की देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार हा प्रश्न चर्चेत होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)