पंढरपुरात राजकीय वातावरण तापलं! प्रशासन भाजपसाठी करतेय, भालके गटाचा आरोप, चिन्ह वाटपापूर्वीच नगरपालिकेत गोंधळ
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. प्रशासन भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप भालके गटाकडून करण्यात आला आहे.
Pandharpur Nagarapalika Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका सुरु आहेत. याच निवडणुकांवरुन राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत (Pandharpur Nagarapalika Election) उद्या चिन्हाचे वाटप होणार आहे. त्यापूर्वीच आज विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीने नगराध्यक्ष व नगरसेवकांना एकच चिन्ह देण्यात यावे या मागणीसाठी अभूतपूर्व गोंधळ घातला. प्रशासन भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप भालके गटाकडून करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पंढरपूरमध्ये सत्ताधारी भाजपच्या विरोधात विविध पक्ष आणि संघटना आणि एकत्र येत भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी असणाऱ्या उमेदवारांना एक चिन्ह मिळावे अशी मागणी केली आहे. यासाठीच ही आघाडी चर्चा करायला आली असता प्रशासनाकडून त्यांना अपक्ष ठरवले जाईल असे सांगितल्याने सर्व नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. वास्तविक तीर्थक्षेत्र विकास आघाडीने या लोकांना एबी फॉर्म जोडून एक चिन्हाची मागणी केली आहे.
नियमाप्रमाणे या आघाडीने अर्ज भरण्यापूर्वी तीन दिवस आधी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून चिन्ह गोठवणे गरजेचे होते. त्यांनी तसे न केल्याने त्यांना अपक्ष धरले जाते असा पवित्रा निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी घेतला आहे. याबाबतचा निर्णय उद्याच चिन्ह वाटपाचे वेळी होईल असेही त्यांनी सांगितले होते. मात्र यावर समाधान न झाल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ येथे दिसून आला.
प्रशासन हे सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप
अर्ज भरल्या दिवशीपासून प्रशासन हे सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून काम करीत असल्याचा आरोप भगीरथ भालके यांनी केला आहे. उद्या जर नगराध्यक्ष व नगरसेवकांना एकच चिन्ह न दिल्यास आम्ही सर्व उमेदवारांसह दोन तारखेपर्यंत नगरपालिकेत ठिय्या आंदोलन करु असेही ते म्हणाले. आम्ही कोणीही मत मागायला न जाता प्रशासनाला पाठिंबा जाहीर करु असा इशारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी दिला आहे. आता उद्याच्या चिन्ह वाटपात प्रशासन कोणता निर्णय घेते यावर पुढचे चित्र अवलंबून असले तरी या निर्णयाचा फायदा भाजपला होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
























