माघी यात्रेवर कोरोनाचं सावट, उद्यापासून पंढरपुरात 24 तास संचारबंदी; आज रात्रीपासून दोन दिवसांसाठी देऊळ बंद
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी चैत्री, आषाढी आणि कार्तिकी या वारकरी संप्रदायाच्या यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल 10 महिन्यानंतर दिवाळी पाडव्याला विठ्ठल मंदिराची दारे भाविकांना मर्यादित स्वरूपात खुली झाली होती. मात्र नवीन वर्षात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने माघी यात्राही भाविकांसाठी रद्द करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे.
पंढरपूर : कोरोनाच्या संकटाचा फटका नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाच्या माघी यात्रेलाही बसला असून आज रात्री 10 वाजल्यापासून 24 फेब्रुवारी सकाळपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. उद्या माघ शुद्ध दशमीच्या रात्री बारापासून एकादशीच्या रात्री बारापर्यंत पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावांत संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. या यात्रेसाठी भाविक अथवा दिंड्यानी येऊ नये म्हणून त्रिस्तरीय नाकेबंदी लावण्यात आली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरात दाखल झाला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी चैत्री, आषाढी आणि कार्तिकी या वारकरी संप्रदायाच्या यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल 10 महिन्यानंतर दिवाळी पाडव्याला विठ्ठल मंदिराची दारे भाविकांना मर्यादित स्वरूपात खुली झाली होती. मात्र नवीन वर्षात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने माघी यात्राही भाविकांसाठी रद्द करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे. या यात्रेच्या काळात कोणत्याही दिंडी अथवा भाविकांना पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. उद्या रात्रीपासून 24 तासांची संचारबंदी लावण्यात आली असल्याने रस्त्यावर कोणालाही बाहेर पडत येणार नाही. यापूर्वी शहरातील जवळपास 1200 मठ आणि धर्मशाळेत आलेल्या भाविकांना यात्रा काळात निवास करण्याची परवानगी देऊ नये यासाठी पोलिसांनी सर्व मंथन नोटीस बजावल्याने आता वारकरी संप्रदाय आणि पोलीस यांच्यात संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. जे भाविक यापूर्वीच शहरात आलेत त्यांना बाहेर काढू नये असा इशारा आज बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.पाहा व्हिडीओ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू, पोलिसांकडून चोख सुरक्षाव्यवस्था
माघ शुद्ध एकादशीला विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नित्यपूजेसाठी कोरोनाचे नियम पाळून केवळ पाच जणांना पूजेसाठी उपस्थित राहण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून यांनाही मास्क आणि सोशल डिस्टन्सचे नियम पाळावे लागणार आहेत. देवावर यात्रा काळात सर्व नित्योपचार नियमितपणे होत असतानाही त्याला कोरोनाचे नियम पाळणे मंदिर प्रशासनाला बंधनकारक करण्यात आले आहे. उद्या रात्रीपासून सुरु होणाऱ्या संचारबंदी काळात सार्वजनिक वाहतुकीलाही मर्यादा घातल्या असून कोणत्याही वारकऱ्याला पंढरपूरमध्ये उतरवता येणार नाही.सध्या पंढरपूर परिसरात 46 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून माघी यात्रेला मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई परिसरातून वारकरी येत असतात. या भागात कोरोनाची साथ पुन्हा पसरू लागल्याने प्रशासनाने माघी यात्रेवर कडक निर्बंध घातले आहेत. सध्या विठ्ठल मंदिरात दर दोन तासाला साफसफाई आणि सॅनिटायझेशन करून घेतले जात असून मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क व सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :